Cricket News : येत्या ९ फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरू होणार आहे. पण या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन टी-20 संघाचा कर्णधार आरोन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
सध्या ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला नागपुरातून सुरुवात होणार आहे. इकडे ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर असताना, त्यांच्या कर्णधाराने निवृत्तीची घोषणा केली आहे.
संघाचा सलामीवीर फलंदाज फिंचने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. अॅरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाचे सर्व फॉरमॅटमध्ये 254 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले, त्यात पाच कसोटी, 146 एकदिवसीय आणि 103 टी-20 सामने खेळले आहेत. यावेळी फिंच म्हणाला, मी 2024 च्या पुढील टी-20 विश्वचषकापर्यंत खेळणार नाही, हे लक्षात घेऊन पद सोडण्याची आणि त्या स्पर्धेसाठी संघाला वेळ देण्याची हीच योग्य वेळ आहे.
याशिवाय तो म्हणाला की, माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्या चाहत्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांचेही मी खूप आभार मानू इच्छितो. 2021 मध्ये दुबई येथे फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने त्यांचा पहिला T20 विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने वनडे कर्णधारपदाची निवृत्ती जाहीर केली होती.
फिंच हा टी-20 फॉरमॅट क्रिकेटचा स्टार खेळाडू होता आणि त्याला 2020 मध्ये ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द डिकेड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने 2018 मध्ये हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध फक्त 76 चेंडूत 172 धावा करून T20I मधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला, ज्यामध्ये 10 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता. याशिवाय 2013 मध्ये साऊथम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध 63 चेंडूत 156 धावा केल्या होत्या.