गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ब्रह्मपुरी तालुक्यातील बरड (किन्ही) येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
चंद्रपूर : धर्मांधता व अंधश्रद्धेच्या नादी न लागता थोर महात्मे, तसेच राष्ट्रसंतांच्या विचारांना प्रेरणास्थान मानून त्यांच्या कार्याचे अवलोकन करत दाखविलेल्या दिशादर्शक मार्गावर चालण्याचा प्रयत्न केल्यास मानवी जीवन यशस्वी होईल. तद्वतच भजन कीर्तन व प्रवचने ही समाजाला खरी सात्विक जीवनाची दिशा देणारे स्रोत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी तालुक्यातील बरड (किन्ही) येथे आयोजित विदर्भस्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी आयोजित भजन स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्यास अध्यक्ष म्हणून माजी जि. प. सदस्य राजेश कांबळे, कृउबा समितीचे प्रशासक प्रभाकर सेलोकर, ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, सामाजिक कार्यकर्ते नारायण तुपट, ॲड. संजय ठाकरे, मोंटू पिल्लारे, आनंदराव सेलोकार, ओमदेव ठाकरे, भास्कर गोटेफोडे, आसाराम बगमारे, वसंत बगमारे, तानाजी दानी, माधुरी भंगे, सुनीता मेश्राम, सुचिता दानी, संदेशा गुरनुले, संगीता पाकडे व इतर मान्यवर, तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि भजन स्पर्धेतील स्पर्धक मंडळ व बहुसंख्या गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राष्ट्रनिर्माण करणे हेतु मातृभूमीच्या संतांनी आपले जीवन समर्पित करून लोकल्याणाचे पवित्र कार्य पार पाडले. अशा कर्मयोगी थोर संतांची शिकवण अंगी रुजवून समाजातील अंधश्रधा व धर्मांधांकडून पसरविण्यात येणारी अराजकता या समाजघातक वृत्तींना थारा न देता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे नेत यशस्वी जीवनाची मुहूर्तमेढ करावी. तसेच भजन, कीर्तन व प्रवचने या माध्यमातून गुरुदेव सेवा मंडळांनी जो वसा घेतला आहे यातून समाजाला सात्विक जीवन जगण्याची दिशा द्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळातील ज्येष्ठ मंडळींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने विविध ठिकाणाहून आलेले भजन मंडळ स्पर्धक गावातील प्रतिष्ठित व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.