कळवण : तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्याचे (Road Construction) काम रखडल्याने नागरिक आंदोलन (People`s agitation) करतात. हा विषय जिल्हा नियोजन मंडळाच्या (DPDC Meeting) बैठकीतही गाजला. त्याला कळवण तालुक्याची स्थानिक राजकीय पार्श्वभूमी असल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॅा. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी त्यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही चुकीची माहिती देता, त्यामुळे लोक माझ्या विरोधात आंदोलन करतात या शब्दात अधिकाऱ्यांना खडसावले. (Kalwan city road cunstrction delayed from three years)
येथे नादुरुस्त रस्त्यामुळे अनेकदा अपघात झाले असून, दोन दिवसांपूर्वीही दोघांना प्राण गमवावे लागले. कोणतीही अडचण नसताना संबंधित ठेकेदाराकडून काम करण्यास उशीर होत असून, आतापर्यंत त्याला दोनदा मुदतवाढ देऊनही काम अपूर्ण आहे.
याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार नितीन पवार यांनी पालकमंत्री दादा भुसे यांचे लक्ष वेधत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पालकमंत्री भुसे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने एचएमपी बिल्डकॉन प्रा. लि. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली असून, कळवण पोलिस ठाण्याला पत्र देऊन तपासात दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करण्याची विनंती केली आहे.
केंद्र सरकारच्या निधीतून कळवण शहरात हायब्रीड अम्युनिटी मॉडेल (हॅम) अंतर्गत तीन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराला तीन वर्षांपूर्वी कार्यारंभ आदेश दिले होते. त्यानंतर कोरोनाचे कारण सांगत संबंधिताने काम पूर्ण करण्यास उशीर केला. एकच काम तीन वर्षांपासून सुरू असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वाहन चालकांना वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यातच अनेकदा अपघात झाले आहेत. यामुळे या रस्ता कामाविरोधात नागरिकांच्या मनात असंतोषाची भावना आहे. अनेक वेळा याबाबत बैठका झाल्या. दोन वेळा आंदोलने झाली. दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. यामुळे नागरिकांनी निषेध करीत रस्ता रोको आंदोलन केले. आमदार नितीन पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची व रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली.
आमदार पवार यांची आक्रमक भूमिका आणि रस्त्यांची गंभीर परिस्थितीमुळे पालकमंत्री भुसे यांनी कळवण तालुका हद्दीतील कामे तत्काळ पूर्ण करण्याची सूचना अधीक्षक अभियंता सोनवणे यांना केली.