रत्नागिरीः ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज चिपळूणमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एकदा भूमिका घेतल्यानंतर मी कधीही दुष्परिणामांची चिंता करीत नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.
भास्कर जाधव यांच्या घरावर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या घराबाहेर काही संशयास्पद वस्तूदेखील आढळल्या आहेत. याशिवाय भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विखारी शब्दांमध्ये जाधवांवर टीकास्र सोडलं. आज निलेश राणेंनीही त्यांना टार्गेट केल्याचं दिसून आलं.
आज शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान भास्कर जाधव चिपळूण स्थानकावर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी बोलतांना जाधव म्हणाले की, मागील काही दिवसांपासून आमच्या पक्षप्रमुखांवर खालच्या स्तरावर टीका केली जात आहे. आमचे ४० सहकारी सोडून गेले. भाजपने शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे शिवसैनिक आतल्या आत तळपत आहे. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन करीत आहेत. परंतु आता शिवसैनिक डरकाळी फोडण्याच्या तयारीत असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं.
एकदा भूमिका घेतल्यानंतर आपण परिणामांची चिंता करीत नाही, असं भास्कर जाधवांनी यावेळी ठणकावून सांगितलं. भाजप नेते आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाक् युद्ध सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप करतांना उभय पक्षांकडून एकमेकांवर खालच्या स्तरावर बोललं जात आहे.