पुणे : पुण्यात विधानसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणूक होणार असून या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. कसब्यातून हेमंत रासने यांना, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे.
पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. हेमंत रासने हे तीनदा मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. या जागेसाठी भाजपकडून हेमंत रासने यांच्यासह गणेश बिडकर, धीरज घाटे आणि टिळक कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक होते इच्छुक होते. पण पक्षश्रेष्ठींनी हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मात्र पक्षाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारीच जगताप यांच्यावतीने त्यांच्या एका महिला कार्यकर्त्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालयातून अर्ज नेला आहे. आणि आज पक्षाने अश्विनी जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. आता हेमंत रासने आणि अश्विनी जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.