मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मसनेप्रमुख राज ठाकरे यांची सरकार स्थापन झाल्यापासून अनेकवेळा भेटीगाठी होत आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजपा आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली आहे. मुंबई भाजपच्यावतीने सातत्याने खासगी कंपन्यांकडून मनसेसोबतच्या युतीबाबत सर्वेक्षणे केली जात असल्याची माहिती समोर येत होती. आता आणखी एक महत्वाची माहिती हाती लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपाने मास्टरप्लॅन तयार केला आहे. भाजपा मनसेशी थेट युती टाळण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे गट मनसेशी युती करुन जागा देणार असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपाकडून मनसेला अदृश्य हातांनी मदत केली जाणार आहे. शिंदे गटाने मनसेशी युती करुन त्यांना जागा द्याव्या. शिंदे गटाने मनसेच्या ताकदीनुसार त्यांना जागा देणे, असा भाजपाचा मास्टरप्लॅन आहे. मनसेकडे अनेक प्रभागात चांगले उमेदवार नाही. त्यामुळे त्यांचा वापर ठाकरे गटाची मतं फोडण्यासाठी करता येईल, असा भाजपाचा प्लॅन आहे. तसेच ज्या जागांवर मनसेचं वर्चस्व आहे, असा जागांवर भाजपाकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे याचा राज ठाकरेंना फायदा होणार की तोटा, हे आगामी काळातच समोर येईल.
दरम्यान, भाजपा, शिंदे अन् राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. भाजपवाले अशा भेटीगाठी घेत राहतील, पण फायनल काहीही करणार नाहीत. राज ठाकरे यांना वाट पाहात थकवतील. राज ठाकरे यांच्याबाबत जो अजेंडा असेल तो त्यांच्या गळी उतरविण्यासारखी परिस्थिती आणून ठेवतील. भाजपाच्या ट्रॅपमध्ये न अडकता स्वतःची गणितं भाजपाकडून सोडवून घेण्याचं आव्हान राज ठाकरे यांच्यासमोर असेल. ठाकरे अँड ही भाजपा- शिंदेंची मजबुरी आहे. आपल्या रूपानं ती दूर होते, याचं भान राखत राजदेखील भाजपाला खेळवतील. तितके ते हुशार आहेतच. दिवारमधील शशी कपूर बघा!म्हणतो, मेरे पास माँ है, तसं उद्धव ठाकरेंशी टक्कर घेताना “हमारे पास ठाकरे है’ हे दाखवण्याची पाळी भाजपवर आली तर राज ठाकरे यांना गोंजारावंच लागेल. तशी पाळी आली नाही तर राज ठाकरे यांचा उपयोग वेगळ्या पद्धतीनं केला जाईल. एक मात्र नक्की की ‘लाव रे तो व्हिडिओ ‘मागे काकांचे अदृष्य हात होते. यावेळी अदृष्य हात भाजपचे असतील. तिकडे मुख्यमंत्री शिंदे मांड पक्की करत आहेत. ठाकरेसेनेला ते आणखी धक्के देतील. ते राज ठाकरे यांना गोंजारतील पण भाजपसोबतच्या युतीत आणखी एक वाटेकरी कशाला म्हणून त्यांचा उपयोग युतीच्या बाहेर ठेवून कसा होईल तेही बघतील. एका ठाकरेंपासून मुक्त झालेले शिंदे दुसऱ्या ठाकरेंना मोठं का होऊ देतील?, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.