आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्र हातात घेतली आहेत.शरद पवार स्वत: मुंबईत फिरणार असून पक्षाला वेळ देणार आहेत. कोणता पक्ष सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कार्यकर्त्यांना कामाला लागा, असं सूचक वक्तव्य देखील शरद पवार यांनी दिले आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ उपस्थित होते. मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने पदाधिकारी हजर होते. मुंबई विभागातील पदाधिकाऱ्यांची ही पहिली बैठक होती. या बैठीकाला शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं.
काय म्हणाले शरद पवार ?
शरद पवार यांनी मुंबई महापालिकेसाठी सर्व ठिकाणी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. दर 20 दिवसांनी प्रत्येक वॉर्ड अध्यक्षांकडून तिथल्या परिस्थितीचा अहवाल पवारांना देण्यात येणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतः आपण लक्ष देणार असल्याचं आश्वासन शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिलं.
या बैठकीत शरद पवार यांच्याकडून नवाब मलिक यांचा देखील उल्लेख करण्यात आला. मुंबईत नवाब मलिक यांनी विरोधकांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र त्यांच्याविरोधात अद्याप ठोस पुरावे सादर होऊ शकले नाहीत, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.