Aishwarya Rai Bachchan Legal Notice : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन नेहमीच चर्चेत असते. सध्या ती चित्रपटांमध्ये दिसत नसली, तरी अनेक रेड कार्पेट इव्हेंटमध्ये सहभागी होत असते. आता ऐश्वर्याला सिन्नर तहसील कार्यालयाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. जमिनीचा कर थकविल्याप्रकरणी ऐश्वर्याला ही नोटीस पाठविण्यात आली.
थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी एकूण १२०० थकबाकीदारांना नोटीस यावेळी सिन्नर तहसील कार्यालयाने बजावल्या आहेत. ज्यात ऐश्वर्या रायचा समावेश आहे. ऐश्वर्या रायने सिन्नरमधील जमिनीचा २२ हजार रुपये कर थकवला असून याप्रकरणी सिन्नर तहसील कार्यालयाकडून ऐश्वर्या राय-बच्चनला नोटीस पाठविण्यात आली आहे. मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात १ हेक्टर २२ आर जमिन आहे. तिच्या या जमिनीचा वर्षाच्या करापोटी २१ हजार ९७० रुपयांची थकबाकी आहे. येथील पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सुजलॉन कंपनीत अनेक नेते अभिनेत्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा आहे.