चंद्रपूर, प्रतिनिधी : राज्याचे माजी मंत्री व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरीत सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक १२ ते १५ जानेवारीला “ब्रम्हपुरी महोत्सव २०२३” या महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगण परिसर, ब्रम्हपुरी येथे या महोत्सवाचे आयोजन होणार असून महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची मेजवानी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे.
गुरुवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १२ वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नगर स्वछता अभियान पार पडणार आहे. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा यांनी दिलेली शिकवण पुढे नेत आपला गाव आणि तालुका निरोगी करण्याच्या हेतू ठेवत या अभियानांतर्गत ब्रम्हपुरीतील विविध ठिकाणी स्वछता अभियान पार पडणार आहे. या अभियानाला ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष रिताताई उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, मुख्याधिकारी आयशा झुली, गटनेते व सभापती विलास विखार, सभापती महेश भर्रे, प्रितीश बुरले आणि नगरसेवक अॅड. दीपक शुक्ला आदि उपस्थित राहणार आहेत.
पुढे सकाळी १० वाजता रांगोळी स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने रांगोळीच्या रंगातून विविध कलाकृतींचे दर्शन घेतला येणार आहेत. तर दुपारी २.३० ते ५ वाजेपर्यंत प्रसिद्ध सिने अभिनेत्री अदिती गोवित्रीकर व प्राजक्ता माळी यांच्या विशेष उपस्थितीत झाकी प्रदर्शन व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहेत. या रॅलीच्या निमित्ताने लेझीम व आदिवासी नृत्याचे सादरीकरण होणार असून एनसीसी पथकाची परेड सुद्धा होणार आहे.
सायं. ५.३० वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते कृषी प्रदर्शन व ब्रम्हपुरी महोत्सवाचे औपचारिक उदघाटन सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार भूषवणार असून मुख्य अतिथी म्हणून सिने अभिनेता व समाजसेवक सोनू सूद, ज्येष्ठ अभिनेते असरानी, अभिनेत्री प्राजक्ता माळी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजू परुळेकर व महाराष्ट्र टाईम्सचे नागपूर आवृत्ती संपादक श्रीपाद अपराजित हे उपस्थित राहणार आहे. यावेळी ब्रह्मपुरी भूषण पुरस्काराने सन्मानित पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याला नगराध्यक्ष रिताताई उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, प्रथम नगराध्यक्ष अशोक भैया, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश कांबळे व प्रमोद चिमुरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यानंतर रात्री ७ वाजता “हास्यजत्रा” कार्यक्रम रंगणार असून अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे सूत्रसंचालन व हास्यजत्रेतील प्रसिद्ध विनोदवीरांचे धमाल सादरीकरण रंगणार आहे. तरी या महोत्सवाला सर्वांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.