चंद्रपूर, प्रतिनिधी : २०२३ या नवीन वर्षात दिनांक १२ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ रोजी “ब्रम्हपुरी महोत्सव २०२३” चे आयोजन मोठ्या उत्साहात होणार आहे.
राज्याचे माजी मंत्री व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरीत सालाबादप्रमाणे नवीन वर्षी दिनांक १२ ते १५ जानेवारीला ‘ब्रम्हपुरी महोत्सव २०२३ – उत्सव आनंदाचा, सहभाग प्रत्येकाचा” या महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगण परिसर, ब्रम्हपुरी येथे महोत्सवाचे आयोजन होणार असून या महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
शुक्रवार दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मॅरेथॉन दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निरोगी व तंदुरुस्त आयुष्य जगण्यासाठी व्यायाम हा महत्वाचा घटक असला, तरी त्याचसोबत धावणे हे आपल्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरते. आपल्याला धावण्यातून वेगळी ऊर्जा मिळते. त्यामुळेच यंदा ब्रम्हपुरी महोत्सवाच्या निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक रोशन यादव, ब्रम्हपुरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, क्रीडा आयोजन समितीप्रमुख गोपाळ भानारकर, गोविंद करंबे व सर्व समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.
पुढे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य आरोग्य तपासणी शिबीर पार पडणार आहे. माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी आपला ब्रम्हपुरी तालुका हे स्वस्थ राहावा, यासाठी त्यांनी वेळोवेळी भव्य स्वरूपात आरोग्य शिबीरे राबिवली आहेत. आपण निरोगी तर आपला ब्रम्हपुरी निरोगी, ह्या हेतूने आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरातून सर्वसामान्य जनतेला मोफत उपचार दिले जाणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी मंत्री व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे उपस्थित राहणार असून यावेळी ब्रम्हपुरी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रितम खंडाळे, डॉ. शिरीष वंजारी, डॉ. कपिल अन्नलदेवार, डॉ. सुमित जयस्वाल, डॉ. पंकज लडके आदि उपस्थित राहणार आहे.
पुढे दुपारी २ ते ४ वाजता गेली अनेक वर्षे झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर कार्यक्रमातील मुख्य कलावंत आदेश बांदेकर यांचा गृहमंत्री कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. किरण विजय वडेट्टीवार, रिता उराडे, योगिता आमले, सुनीता तिडके, लता ठाकूर, नीलिमा सावरकर, वनिता अलगदेवे, सरिता पारधी आदी उपस्थित राहणार आहेत.
यानंतर सायं ६ वाजता ब्रह्मपुरी क्षेत्रातील तरुण-तरुणींसाठी “Mr. & Miss ब्रम्हपुरी २०२३” सौंदर्य स्पर्धा पार पडणार आहे. गेल्या आठवड्यात या स्पर्धेचे ऑडिशन्स पार पडलेले असून यातील निवडक स्पर्धकांची अंतिम फेरीत प्रवेश झाला आहे. या अंतिम फेरीतील स्पर्धकांमधून कोण बनेल यंदाचा Mr. & Miss ब्रम्हपुरी २०२३ ? याची उत्सुकता सर्वानाच लागलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी विजय वडेट्टीवार, ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आयशा जुली, तहसीलदार उषा चौधरी, डॉ. स्निग्धा कांबळे, चंद्रपूर जि. प. च्या माजी सदस्य स्मिता पारधी, प्रिती कऱ्हाडे उपस्थित राहणार आहेत.
तर रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध गायक सलमान अली व मनी यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इंडियन आयडॉल या शोमधून घराघरात पोहचलेले सुप्रसिद्ध गायक मनी तसेच १०व्या इंडियन आयडॉल सीझनचे विजेता असलेले सुप्रसिद्ध गायक सलमान अली हे आपल्या सुमधुर गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. यावेळी ब्रह्मपुरी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा नगरसेवक विलास विखार, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष इकबाल जेसानी व डॉ. लक्ष्मीकांत लाडुकर उपस्थित राहणार आहे. तरी या रंगारंग महोत्सवाला चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील नागिरकांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.