ब्रम्हपुरी महोत्सवाला प्रारंभ : सिनेकलावंतांना पाहून भारावले प्रेक्षक; कृषि प्रदर्शनाने वेधले सर्वांचे लक्ष
ब्रम्हपुरी, प्रतिनिधी : सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, शैक्षणिक याचा वारसा जपणाऱ्या ब्रम्हपुरी महोत्सवाची सुरुवात गुरुवारी नगर स्वच्छता अभियान, जनजागृतीपर देखावे, झाकी प्रदर्शन व शानदार अश्या उद्घाटनीय सोहळ्याने झाली. शहरातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने अवघी ब्रम्हपुरीनगरी दुमदुमली. यावेळी सिनेकलावंतांची विशेष उपस्थिती आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली.
संपूर्ण ब्रम्हपुरीवासीय ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या ब्रम्हपुरी महोत्सवाचे उदघाटन गुरुवारी थाटात पार पडले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणुन ब्रम्हपुरी महोत्सवाचे आयोजक राज्याचे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, उदघाटक म्हणून प्रख्यात सिनेअभिनेता सोनू सूद, विशेष अतिथी म्हणून सिनेअभिनेते असरानी, प्राजक्ता माळी, प्रमुख अतिथी म्हणून आ. सुभाष धोटे, किरण विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, संपादक श्रीपाद अपराजित, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अॅड. राम मेश्राम, नगराध्यक्ष रिता उराडे व ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आदि उपस्थित होते.
या महोत्सवाच्या पूर्वार्धात नगर स्वच्छता अभियान तसेच स्थानिक कलावंतासाठी आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेतून कलावंतांनी साकारलेले थोर महात्म्यांचे चित्र विशेष आकर्षण ठरले. तर दुपारी येथील तहसील परिसरातून संपूर्ण शहरभर रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान रस्त्यावर विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या. गोंडी नृत्य हे या रॅलीचे विशेष आकर्षण होते. तसेच तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषय घेऊन या रॅलीत समाजजागृती केली. शहरातील अनेक चौकात छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या रांगोळ्या आकर्षणाचे विषय ठरले होते. ही रॅली न भूतो न भविष्यती होती. या रॅलीने ब्रह्मपुरी परिसरातील लोकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. १५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.
कृषी महोत्सवाने वेधले नागरिकांचे लक्ष
ब्रम्हपुरी महोत्सव २०२३ च्या पहिल्या दिवशी तालुक्यासह दूर वरून आलेल्या नागरिकांना कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी विशेष असे विविध स्टॉल लावून आधुनिक तंत्रज्ञाननानातून शेती, शेती पूरक व्यवसाय कसा करावा याबद्दल अधिकाधिक माहिती देऊन नागरीकांना शेती व्यवसायातून प्रगती यांचे महत्त्व पटवून दिले.
सोनू सूद, प्राजक्ता माळी, आदिती गोवित्रीकर यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
प्रसिद्ध सिनेअभिनेते सोनू सुद यांची चित्रपटसह कोरोना काळात दाखविलेली सह हृदायता यामुळे यामुळे ते चाहता वर्गाच्या गळ्यातील ताईत बनले. सोबतच सिनेअभिनेते असरानी, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी, सिने अभिनेत्री आदिती गोवित्रीकर यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. प्रत्येकजण या कलावंतांना जवळून पाहण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत होते. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.
रात्री हास्यजत्रा कार्यक्रमाने आणली विनोदाची लाट
दिवसभर पार पडलेल्या विविध कार्यक्रमानंतर रात्री हास्यजत्रा कार्यक्रमाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलावंत प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे, वनिता खरात व अन्य कलावंतांच्या धमाकेदार सादरीकरणाने, तसेच गायक स्वप्नील गोडबोले, मुग्धा कऱ्हाडे व अमीर हाडकर आणि त्यांच्या बँड प्रदर्शनाने गुरुवारची रात्र रंगारंग झाली.