चंद्रपूर, प्रतिनिधी : राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस नेते व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरीत सालाबादप्रमाणे या नवीन वर्षी दिनांक १२ ते १५ जानेवारी २०२३ रोजी “ब्रम्हपुरी महोत्सव २०२३ – उत्सव आनंदाचा, सहभाग प्रत्येकाचा” या महोत्सवाचे आयोजन मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. ब्रम्हपुरी महोत्सव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगण परिसर, ब्रम्हपुरी येथे आयोजित होणार असून या महोत्सवाच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांची मेजवानीचा अनुभव आपल्याला घेता येणार आहे.
शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ब्रह्मपुरीतील विद्यार्थी व तरुणांसाठी स्टुडन्ट मोटिवेशन व्याख्यान कार्यक्रमस्थळी पार पडणार आहे. या व्याख्यानाला मुख्य व्याख्याते म्हणून ज्यांच्या शिकवणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात, असे वर्ध्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. नितेश कराळे सर यांचे स्टुडन्ट मोटिव्हेशन वर आधारित मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
वर्ध्यातील फिनिक्स अकॅडमीचे संचालक असलेले प्रा. नितेश कराळे सर हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व मोटिवेटर असून ते आपल्या युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांची विशेष ओळख म्हणजे, त्यांची शिकवण्याची वेगळी स्टाईल. त्यांच्या याच स्टाईलमुळे अनेकजण त्यांच्या व्हिडिओचे चाहते बनले आहेत. याशिवाय मोटिवेशन आणि सामाजिक कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते या ब्रम्हपुरीमध्ये इथल्या विद्यर्थ्यांना स्टुडन्ट मोटिवेशन वर आधारित व्याख्यान देणार आहेत.
या व्याख्यानाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, प्राचार्य डॉ. नामदेवराव कोकोडे, प्राचार्य डॉ. अमिर धम्मानी, प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, तसेच प्रा. डॉ. मोहन वाडेकर, प्रा. डॉ. कुंदन दुफारे आणि प्रा. डॉ. राकेश तलमले हे असणार आहेत. तरी या व्याख्यानाला ब्रम्हपुरी व चंद्रपुरातील विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.