ब्रह्मपुरी महोत्सवाचा दुसरा दिवस : मॅरेथॉन, महाआरोग्य शिबिर, गृहमंत्री कार्यक्रम व सुमधुर गीतांची मेजवानी
ब्रह्मपुरी, प्रतिनिधी : समाजात जन्मलेल्या प्रत्येकाला समाजाचे देणे असते. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करणाऱ्यांपैकी मी नसून एक प्रामाणिक प्रतिनिधी म्हणून त्यांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याचे आद्यकर्तव्यही माझेच आहे. समाजातल्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवा देणे हे लोकप्रतिनिधित्वातून मिळालेली जनसेवेची ही संधी म्हणजे समाजऋण चुकविण्याचा मार्गच आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी महोत्सवानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भव्य मॅरेथॉन स्पर्धेत लहान मोठे, वृद्ध, महिला युवक, युवती धावल्याने अवघे ब्रह्मपुरी शहर धावल्याचे चित्र निर्माण झाले होते. तर दुसरीकडे महोत्सवाच्या निमित्ताने पंचशील वसतिगृहाच्या पटांगणावर आरोग्यधाम भरले होते. शहराला सांस्कृतिक, क्रीडा व आरोग्य वैभव प्राप्त झाले आहे. या वैभवांना ब्रह्मपुरी महोत्सव सातत्याने चालना देण्याचे काम करीत आहे. शुक्रवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ख्रिस्तनंद चौक ते तंत्रनिकेतन महाविद्यालयापर्यंत भव्य मॅरेथॉन स्पर्धेने संपूर्ण शहर धावल्याचे जणू चित्र निर्माण झाले होते. स्वतः आयोजक आ. विजय वडेट्टीवार, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका यांचा मेळच त्या रस्त्यावर दिसत होता. तर तर दुपारी स्थानिक पंचशील वसतिगृहाच्या प्रांगणावर दंतचिकित्सक कॅन्सर निदान, याकरिता विशेष अत्याधुनिक यंत्रासह निर्माण केलेली व्हॅनला पाचारण करण्यात आले होते. तर डोळ्यांचे आजार, तपासणीकरिता नागपूर येथील प्रसिद्ध महात्मे रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती. पोटाचे आजारावर मुंबई, पुणे, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याचा धाम भरल्याने दुसऱ्या दिवशीही ब्रह्मपुरी महोत्सव फुलला होता. महाआरोग्य तपासणी शिबिरात दोन हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.
महोत्सवाच्या दुपारच्या सत्रात सामाजिक कार्यकर्त्या किरण विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या सिने अभिनेते आदेश बांदेकर यांचा ‘गृहमंत्री’ कार्यक्रम बघण्याकरिता महिलांनी एकच गर्दी केली होती. यात शहरासह परिसरातील बहुसंख्य महिला स्पर्धकांनी भाग घेऊन प्रश्नावलींची अचूक उत्तरे देणाऱ्या विजेता स्पर्धकांना पैठणी देऊन गौरविण्यात आले.
इंडियन आयडल सलमान अली व लिटिल चॅम्प मनी ने जिंकली ब्रह्मपुरीकरांची मने
आपल्या मधुर सुरांनी देशासह परदेशातही तरुणाईच्या गळयातील ताईत बनलेल्या इंडियन आयडल विजेता सलमान अली यांनी गीत गायनास सुरुवात करताच तरुण-तरुणींनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. तर गीत गायनातील बड़े मियॉनंतर लिटिल चॅम्प विजेता छोटे मियॉ मनी यानेही आपल्या आवाजातून प्रेक्षकांना रिझविले. या दोन्ही गायकांनी आपल्या गायनाच्या कलेतून संपूर्ण ब्रह्मपुरीकरांना वेड लावले.