ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी 45 दिवसांच्या कार्यकाळानंतर गुरुवारी अचानक राजीनामा दिला. लिझ ट्रस राजीनामा देणार असल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून लावला जात होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांची पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी स्पर्धा सुरु होती. आता लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यावेळीही त्यांचा मार्ग सोपा नसल्यामुळं त्यांना अनेक दिग्गजांशी सामना करावी लागणार आहे.
लिझ ट्रस यांच्या विरोधात लढलेले माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्यासाठी उत्सुक आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी सुनक यांच्याकडं सध्या 13/8 असा मतांचा फरक आहे. जर ते जिंकले तर सुनक हे ब्रिटनमध्ये सर्वोच्च पद भूषवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती असतील.
बोरिस जॉन्सन :
लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सनही मैदानात उतरू शकतात, अशीही बातमी आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांना हटवण्यात आलं असलं तरी ते पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत बाजी मारू शकतात. वृत्तानुसार, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जॉन्सन यांना मिळालेल्या जनादेशाचा अजूनही फायदा होऊ शकतो, असा अंदाज आहे.
पेनी मॉर्डंट :
ब्रिटनचे माजी संरक्षण सचिव पेनी मॉर्डंट यांचंही नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आलं आहे. या वर्षीच्या कंझर्व्हेटिव्ह निवडणुकीत मॉर्डंट यांनी ट्रस आणि सुनक यांच्यानंतर तिसरं स्थान पटकावलं आहे. त्यांच्याकडं सर्वमान्य उमेदवार म्हणून पाहिलं जातं आहे.
बेन वॉलेस :
ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वॉलेस हे यावेळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. स्कॉट्स गार्ड्स इन्फंट्रीमॅन असलेले वॉलेस हे स्कॉटिश संसदेचे सदस्यही राहिले आहेत. यानंतर ते व्हायर आणि प्रेस्टन नॉर्थमधून खासदार म्हणून निवडून आले. त्यांना ब्रिटिश राजकारणाचा मोठा अनुभव आहे.
जेरेमी हंट :
ब्रिटनचे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट हेही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला क्वासी क्वार्टेंगची जागा घेतली. या महत्त्वाच्या पदावर असल्याने ते ब्रिटनच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही सामील होऊ शकतात, असं मानलं जात आहे. जेरेमी सरकारमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जातात आणि एक स्थिर पर्याय म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे. त्यांनी यापूर्वी परराष्ट्र सचिव, आरोग्य सचिव आणि संस्कृती सचिवांसह अनेक वरिष्ठ सरकारी पदं भूषवली आहेत.
लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सध्या आघाडीवर असलेली ही 5 नावं आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या निवडणुकीत फक्त तीनच उमेदवार सामील होऊ शकतात. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांच्या संख्येनुसार, या निवडणुकीत केवळ तीन नावं अंतिम दावेदार असू शकतात. कारण, उमेदवाराला किमान 100 खासदारांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे आणि पक्षाकडं सध्या 357 खासदार आहेत. या अर्थानं मुख्य शर्यतीत तीनच दावेदार असू शकतात.