Delhi : आग्रामध्ये लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उमटली आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी आता थेट दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, याचविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांना पत्रही दिलं आहे.
आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाकडून कैद करण्यात आलं होतं आणि त्यातून महाराजांची सुटका करण्याची ऐतिहासिक घटनाही घडली होती. याच घटनेला उजाळा देण्यासाठी आग्र्यात शिवजयंती साजरी करण्याचं शिवप्रेमींनी ठरवलं होतं. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रही दिलं होतं. पण तरीही पुरातत्व विभागाने परवानगी दिली नाही.
त्यामुळे हे प्रकरण अखेर हायकोर्टात गेलं आहे. पुरातत्व विभागाच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्याकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना या आधी परवानगी दिली मग शिवजयंती बाबत भेदभाव का, असा सवालही या याचिकेतून विचारण्यात आला आहे.
याआधी अदनान सामी आणि इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम आग्र्याच्या किल्ला परिसरात झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या सोहळ्याला आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत, त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी द्यावी असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. मात्र तरीही परवानगी मिळाली नाही.