New Delhi : एकीकडे बदललेल्या वातावरणामुळे (Climate Change) सर्वत्र आरोग्याच्या समस्या दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून एच३एन२ (H3N2) या नव्या विषाणूने डोके वर काढलेले असताना आता कोरोनाचेही (Covid-19) पुनरागमन झाले आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे २३६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांवर दुहेरी संकट ओढवल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना (Covid-19) महामारीने सर्वांचेच आयुष्य बदलवून टाकले आहे. ठराविक टप्प्याने कोरोना आपले अस्तित्व दाखवित आहे. त्याचाच एक भाग असल्यागत पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढल्याचे आरोग्य यंत्रणेने जाहीर केले आहे. मागील २४ तासांत दिल्लीत (Delhi) नवीन ७२ तर राज्यात २३६ रुग्ण आढळले आहेत. ही स्थिती लक्षात घेत पुन्हा एकदा टेस्टिंग वाढविण्यात येत आहेत. तसेच मास्क अनिवार्य करावे का, यावरदेखील विचार सुरू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Health Minister) महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्य सरकारांना (State Government) कोविड चाचणी, ट्रॅकिंग, उपचार आणि लसीकरणाच्या धोरणाचं पालन करण्यासाठी पत्र लिहिले होते. या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे मंत्रालयाने या राज्यांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे.
दुर्लक्ष नको, डॉक्टरचा सल्ला घ्या
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या (Health Minister) नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला ५ दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषध घेतले जाऊ शकते. पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे, असे सांगण्यात आले आहे.