आम्हाला शरद पवार यांच्यावर कुठलेही व्यक्तिगत आरोप करायचे नाहीत असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच बारामतीपासून आम्ही घड्याळ बंद करण्याचा कार्यक्रम सुरू करू आणि आमचा पक्ष वाढवू असेही बावनकुळे म्हणाले.
नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले की, आम्हाला शरद पवार यांच्यावर कुठलेही व्यक्तिगत आरोप करायचे नाहीत. आम्हाला व्यक्तिगत आरोप करून मोठे व्हायचे नाही. आम्ही बारामतीपासून घड्याळ बंद करण्याचा कार्यक्रम सुरू करू. ही बाब राष्ट्रवादीच्या लोकांनी व्यक्तिगतरित्या घेतली. घड्याळ बंद करून आम्ही आमचा पक्ष वाढवणारच अस निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तसेच अशा गोष्टी व्यक्तिगत घेऊन राष्ट्रवादीचे लोक सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या सहानुभूतीच्या माध्यमातून ते पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप बारामतीमधून निवडून येण्यासाठी काम करेलच. आमचा भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीसारखे जगप्रसिद्ध व्यक्ती आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल आम्ही काही बोलणार नाही, त्यांनी त्यांचे काम करावे आम्ही आपले काम करणार. काँग्रेस पक्ष हा बुडणारे जहाज आहे. या बुडणार्या जहाजाची बरोबरी भारतीय जनता पक्षासोबत होणार नाही. भारतीय जनता पक्ष हा हायस्पीड बुलेट ट्रेन आहे असेही बावनकुळे म्हणाले.