शोक संवेदना : माजी आमदार बाबुराव वाघमारे यांचे निधन
Chandrapur : क्रांतीभूमी चिमूरच्या १९९०-९५ च्या रणसंग्रामात काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांपैकी एक असे निष्ठावंत कार्यकर्ते बाबुराव वाघमारे यांना उमेदवारी देऊन आमदार केले. पक्षाने टाकलेल्या जबाबदारी व विश्वासाला तडा न जाऊ देता जनतेची कामे हिरीरीने करून अविकसित क्षेत्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चळवळ उभारणारे व कर्तव्याप्राती अतिशय प्रामाणिक असे माजी आमदार बाबुराव वाघमारे यांच्या निधनाने ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेले कर्तुत्वान नेतृत्व हरपल्याची खंत व्यक्त करत पक्षाची मोठी हानी झाल्याची शोकसंवेदना राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. ते माजी आमदार बाबुराव वाघमारे यांच्या अंतविधीप्रसंगी शोकसभेत बोलत होते.
गेल्या अनेक वर्षांपासून दीर्घ आजाराशी सामना करतांना काल रात्री ७.३० वाजेच्या सुमारास १९९०-९५ कालावधीतील चिमूर मतदारसंघाचे आमदार बाबुराव वाघमारे यांची प्राणज्योत मावळली. ही वार्ता कानी पडताच राजकीय वर्तुळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काँग्रेस नेते यांच्यात शोककळा पसरली. आज सकाळ पासून माजी आमदार बाबुराव वाघमारे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पक्ष कार्यकर्त, नेते व चाहता वर्ग यांच्या रांगा लागल्या. तर दुपारी २ वाजेच्या सुमारास मोहाडी (नलें) येथील मोक्षधाम येथे अंत्यविधी करिता हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
माजी आमदार बाबुराव वाघमारे यांना श्रध्दांजली अर्पण करीत शोक संवेदना व्यक्त करतांना माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाले, राजकारणातील ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्यांना घेऊन शासनदरबारी मांडणाऱ्या माजी आमदार बाबुराव वाघमारे यांची कार्यकुशलता व धडपड ही युवा राजकारण्यांना प्रेरणा देणारी आहे. चौफेर उमा नदीने वेढलेल्या क्षेत्रातील गावांना छोटे पूल, रस्ते व अन्य विकासकामांना प्राधान्य क्रमाने महत्त्व देऊन ते मंजूर करण्यात अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली. त्यांचे कार्य हे आजही व उद्याही अजरामर राहतील, अशी शोक संवेदना माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. तर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी माजी आमदार बाबुराव वाघमारे यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकत त्यांची जीवन शैली, पक्षनिष्ठा व कार्य करण्याची तळमळ याची विस्तृत माहिती उपस्थित जनसमुदायाला देत सहवासातील माजी आमदार बाबुराव वाघमारे यांच्या प्रति आपल्या शोक संवेदना प्रकट केल्या. यानंतर माजी आमदार डॉ. रमेश गजबे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गेडाम, रघुनाथ शेंडे, माजी जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे, अशोक नागापुरे, बाबूलाल शेंडे, हरिभाऊ बारेकर, अरविंद जयस्वाल,अशोक साळवे, मधुकर मुपीडवार, सिंदेवाही तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, उपाध्यक्ष संजय गहाने, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, अभिजीत मुपीडवार यांनी शोक सभेतून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘स्वर्गीय माजी आमदार बाबुरावजी वाघमारे अमर रहे’ अशा घोषणा देत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले.