Oppenheimer Movie : क्रिस्तोफर नोलनच्या या चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका किलियन मर्फी साकारणार आहे.
Oppenheimer Movie Trailer : अणूबॉम्बचा जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अशा जे रॉबर्ट ओपनहायमर यांची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. हॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलनच्या आगामी ‘ओपनहायमर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि अपेक्षेप्रमाणेच नोलनने या चित्रपटालाही वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलं आहे. नोलनच्या या चित्रपटाची चर्चा खूप आधीपासून सुरू होती.
नोलन या चित्रपटाच्या माध्यमातून जे रॉबर्ट ओपनहायमर या शास्त्रज्ञाची कथा सांगणार आहे. ओपनहायमर हे यूनिवर्सिटी ऑफ कैलिफॉर्निया मध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मध्येही योगदान दिलं आहे, यामुळेच त्यांना अणूबॉम्बचा जनक मानलं जातं. या चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका किलियन मर्फी साकारणार आहे.
याआधी किलियन मर्फी याने नोलनबरोबर ‘इनसेप्शन’, ‘द डार्क नाइट’, ‘डंकर्क’ अशा चित्रपटात काम केलं आहे. शिवाय नेटफ्लिक्सच्या ‘पिकी ब्लाइंडर्स’ या वेबसीरिजमुळे किलियनची लोकप्रियता आणखी वाढली आहे. ‘ओपनहायमर’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही नोलनने केलं असून १०० मिलियन डॉलर्स इतक्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे. नोलनच्या इतर चित्रपटांच्या मानाने याचं बजेट सर्वात कमी आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमधून नेहमीप्रमाणेच नोलनने लोकांना चकित केलं आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल फारसं काही न सांगता ट्रेलरमधून त्याने ओपनहायमर यांच्या जीवनप्रवासाचे महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत. विशेष म्हणजे, कॉम्प्युटर ग्राफिक्सचा वापर न करता ‘अणूबॉम्ब डेटोनेशन’चं चित्रीकरण केलं आहे आणि याची सर्वत्र चर्चा आहे. २०२० च्या ‘टेनेट’ नंतर आता नोलनच्या या चित्रपटाची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २१ जुलै २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.