मुंबई, 29 एप्रिल : सीएनजी गाड्यांची झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे त्यांच्या फीलिंग स्टेशनची संख्याही वाढली आहे. तुम्हीही सीएनजी गाडी चालवत असाल तर जेव्हाही तुम्ही गॅस भरण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला गाडीतून खाली उतरण्यास सांगितलं जाईल. काही लोक याला विरोधही करतात, पण ही एक आवश्यक प्रक्रिया आहे. कारमध्ये बसून सीएनजी भरून घेताना तुमच्या जीवालाही धोका होऊ शकतो. पण, असं का करण्यास सांगितलं जातं, असा मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण पेट्रोल आणि डिझेल भरताना चालकांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितलं जात नाही. चला तर मग जाणून घेऊया कारमध्ये सीएनजी भरताना चालकाला खाली उतरण्यास का सांगितलं जातं.
स्फोट होण्याची भीती
चालकांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितलं जातं, कारण हा एक कॉम्प्रेस्ड गॅस आहे. तापमान वाढल्यावर तो वेगाने विस्तारू शकतो, म्हणजे त्याचा व्हॉल्युम वाढू शकतो. अशा स्थितीत सीएनजी टाकी फुटून तो गॅस बाहेर येऊ शकतो. असं झाल्यास मोठा स्फोट होऊन आग लागू शकते.
आग लागण्याचा धोका
सीएनजी किटमध्ये जर कुठे लिकेज असेल तर ते तुम्हाला कळत नाही. गॅस भरताना ते लिकेज वाढू शकतं. अशा परिस्थितीत या लिकेजमधून बाहेर पडणाऱ्या गॅसला आग लागू शकते व लिकेजमुळे मोठा स्फोट होऊ शकतो.
टाकीत पाणी असल्यास उद्भवतो धोका
चुकीच्या ठिकाणाहून गॅस भरून घेतल्यावर अनेक वेळा टाकीमध्ये पाणी भरते. त्यामुळे, ते टाकीमध्ये मोठी जागा व्यापते आणि जेव्हा तुम्ही गॅस भरता तेव्हा आतमध्ये दाब तयार होतो. अशा स्थितीत तो बॉम्बप्रमाणे काम करतो आणि नंतर मोठा स्फोट होतो.
या तिन्ही स्थितीत गाडीच्या आत कोणी बसलं असेल तर गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्युही होऊ शकतो. त्यामुळे सीएनजी भरताना वाहनात बसलेल्या सर्वांनी बाहेर उतरावं. जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळता येईल. यासोबतच सीएनजी किट नेहमी कंपनीतून बसवून घ्यावं, जर तुम्ही नंतर कारमध्ये सीएनजी किट बसवलं असेल तर ते सर्टिफाईड असेल व त्याची वॉरंटी असेल याची खात्री करून घ्या.
गाडीतून उतरण्याचा बऱ्याच जणांना कंटाळा येतो, पण ते तुमच्या सुरक्षेसाठी असतं, त्यामुळे जेव्हाही कारमध्ये सीएनजी भरत असाल, तेव्हा न चुकता गाडीतून खाली उतरा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्त हानी टाळता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.