मंठा येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
Jalna : जिल्ह्यातील मंठा (Mantha) तालुक्यातील माळेगाव (Malegaon) येथे प.पू. श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य प.पू. श्री आनंद चैतन्य बापूजी यांच्या सुमधुर वाणीतून सुरू असलेल्या तीन दिवसीय श्री गीता रामायण सत्संग सोहळ्याची सांगता भक्तिमय वातावरणात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी धर्ममंचावर प.पू. श्री योगानंद महाराज यांची उपस्थिती होती.
माळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माधव चव्हाण (Madhav Chavhan), अ.भा. चैतन्य साधक परिवार व ग्रामस्थांच्या वतीने तीन दिवसीय श्री गीता रामायण सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संग सोहळ्याला माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar), आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad), माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, संत रायसिंग महाराज यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी सांगितले की, धार्मिक कार्यक्रम व सत्संगातून काम करण्यास प्रेरणा व ऊर्जा मिळते. पोहरादेवी (Pohradevi) संस्थांनचा विकास व्हावा अशी प. पू. रामराव महाराज यांची इच्छा होती. महाराजांनी मला आशीर्वाद दिला आणि मी कामाला लागलो. बंजारा समाजाचा इतिहास व संस्कृती भावी पिढीला समजली पाहिजे. यासाठी काम करणार असल्याचे ना. राठोड यांनी सांगितले. माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन दिले. प.पू. श्री आनंद चैतन्य बापूजी यांनी सत्संग सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजक माधव चव्हाण (Madhav Chavhan) यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून सत्कार केला. ‘हरे रामा हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा’ या भजनावर भाविक भक्त तल्लीन झाले होते. माळेगाव नगरी भक्ती भावात न्हाऊन निघाली. प.पू. महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी उपदेश केला. चुकीचे कर्म केले तर नरक भोगावे लागेल, चांगले कर्म केले तर स्वर्ग मिळेल. असे सांगून वाईट कर्म तेथे दुःख व सुख तेथे स्वर्ग असे विवेचन केले. या देशाच्या रक्षणासाठी ज्या शूरवीर जवानांनी बलिदान दिले त्यांची आठवण काढत “ये मेरे वतन के लोगो…..”, “जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा…..” अशी देशभक्तीपर गीते गाऊन संपूर्ण वातावरण देशभक्तीमय करून टाकले.
यावेळी चव्हाण यांनी प्रास्ताविक करताना युवक वर्गाला रोजगाराच्या संधी शासन स्तरावर उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडे केली. जालना (Jalna) जिल्ह्यात माळेगावची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे, यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
माळेगावची वेगळी ओळख
मंठा (Mantha) तालुक्यातील माळेगावमध्ये अद्यापही सोयी सुविधांचा अभाव आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून एसटी बस ग्रामस्थांनी कधी पाहिली नाही. या ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था नाही. तसेच आरोग्य उपकेंद्र नसल्यामुळे माळेगावच्या ग्रामस्थांना मंठा किंवा जालना (Jalna) येथे जावे लागते. सर्व सुविधा माळेगावच्या ग्रामस्थांना मिळाली पाहिजे आणि जालना जिल्ह्यात माळेगावची वेगळी ओळख निर्माण करणार असा शब्द मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिल्याचे माधव चव्हाण (Madhav Chavhan) यांनी सांगितले.
पोहरादेवीचा चेहरामोहरा बदलणार – मंत्री राठोड
एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण समाजात काम करतो, बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवीचा (Banjara) विकास व्हावा, अशी राष्ट्रीय संत परमपूज्य रामराव महाराजांची इच्छा होती. त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आणि मी कामाला लागलो. या माध्यमातून बंजारा समाजाचा इतिहास व संस्कृती भावी पिढीला समजली पाहिजे यासाठी काम करायचे आहे. एका वर्षात पोहरादेवीचा चेहरा-मोहरा बदलणार अशी ग्वाही मंत्री राठोड यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते माधव चव्हाण (Madhav Chavhan) यांना सहकार्य करा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.