चंद्रपूर, प्रतिनिधी : राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (दि. २६) जिल्ह्यातील दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव गोविंदराव बनकर यांचे काही दिवसांपूर्वीच वृद्धापकाळाने निधन झाले होते. आ. विजय वडेट्टीवार यांनी बनकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ते म्हणाले, की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व देशातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कधी न मिटणारी आपली छाप त्यांच्या पश्चात ठेवली आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसारणी हा त्यांचा स्थायीभाव होता. गरजूंना दान करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या जाण्याने स्वातंत्र्य लढ्यातील एक दुवा आता निखळला आहे. तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकाला व समाजसेवकाला चंद्रपूर जिल्ह्याने कायमचे मुकले आहेत. स्व. बाबुराव बनकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वडेट्टीवार कुटुंबीय त्यांच्या दुःखात सहभागी आहे.
पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री, हंसराज अहीर यांचे बंधु हितेंद्र अहीर यांचे १२ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले होते. यावेळी त्यांनी हंसराज अहीर यांच्या राहत्या घरी भेट देऊन अहीर कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच स्व. हितेंद्र अहीर यांची दोन्ही मुले हर्षवर्धन व आदित्यवर्धन यांच्याशी संवाद साधून त्यांना भावनिक आधार दिला. स्व. हितेंद्र अहीर यांच्या आत्म्यास ईश्वर शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य अहीर परिवारास मिळो, अशी प्रार्थना आ. वडेट्टीवार यांनी ईश्वराकडे केली.
चंद्रपूर महानगरपालिकेतील माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर यांच्या मातोश्री सरोजिनी पडवेकर यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. या दुःखद प्रसंगी पडवेकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन विजय वडेट्टीवार यांनी केले. पडवेकर कुटुंबाच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग असून त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो, अशी प्रार्थना आ. वडेट्टीवार यांनी केली.