पुणे : शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण चांगलच तापलं आहे. दरम्यान, आज कसबा पेठेतून काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी धंगेकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.
आज सकाळी साडेनऊ वाजता कसबा गणपती व दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर अर्ज भरण्यास जाणार असल्याचे शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. तसेच, पोटनिवडणुकीसाठी आपली तयारी झाली असून विरोधकांकडून कोणताही उमेदवार असला तरी निवडणूक जिंकू असा विश्वास रविंद्र धंगेकर यांनी काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. धंगेकर यांच्या काळात कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली गेलेली आहेत.
कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचे नाव जाहीर झाले आहे, त्यामुळे कसब्यात आता या दोघांमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.