जयपूर, 28 एप्रिल : आय़पीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला 32 धावांनी हरवलं. या विजयासह राजस्थानने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. दरम्यान, सामन्यात विजय मिळवूनही राजस्थान रॉयल्सने जयपूरच्या प्रेक्षकांची माफी मागितली आहे. महेंद्र सिंह धोनीला फलंदाजी करताना तुम्हाला पाहता आलं नाही याबद्दल राजस्थान रॉयल्सने माफी मागितली. चेन्नईचा यंदाच्या हंगामातील हा तिसरा पराभव आहे. यातील दोन पराभव हे राजस्थान रॉयल्सविरुद्धच झाले आहेत.
राजस्थानने चेन्नईसमोर 203 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला ६ बाद १७० धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून शिवम दुबेने 52 धावांची खेळी साकारली. तो अखेरच्या चेंडूवर बाद झाला तर रविंद्र जडेजा 23 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी फलंदाजीला आला नाही. याबद्दलच राजस्थान रॉयल्सने ट्विटरवरून जयपूरच्या प्रेक्षकांची माफी मागितली.
IPL 2023 : RCB साठी कायपण! जिंकत नाय तोपर्यंत शाळेत जाणार नाही, चिमुकलीचा Photo Viral
राजस्थान रॉयल्सने ट्विटरवर म्हटलं की, “सवाई मानसिंह स्टेडियमच्या प्रेक्षकांची माफी मागायचीय कारण आज त्यांना धोनीला फलंदाजी करताना पाहण्याची संधी मिळाली नाही. पण आम्हाला आशा आहे की घरच्या मैदानावर पहिल्या विजयामुळे तुम्ही आनंदी असाल.” राजस्थानच्या संघाने चेन्नईविरुद्ध जबरदस्त कामगिरी केलीय. चेन्नईचा संघ सलग तीन सामन्यात विजयी झाला होता. तर त्यांना याधी चेपॉकवर राजस्थाननेच हरवलं होतं.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने गेल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना केला होता. आता चेन्नईला हरवून ते पुन्हा रुळावर आले आहेत. राजस्थान गेल्या 6 सामन्यात चेन्नईवर वरचढ ठरलीय. सहा पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर या विजयासह राजस्थानने पॉइंट टेबलमध्येही पहिल्या स्थानी झेप घेतलीय. चेन्नईच्या संघाला मात्र डबल दणका बसला असून पराभवासह तिसऱ्या स्थानी घसरण झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.