राज्यातील घटना या वादळाप्रमाणे घडत गेल्या . एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर लगेच कामालाही सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयात जाऊन उपमख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली आहेत. ज्याठिकाणी अजित पवार हे बसून काम करायचे त्याच ठिकाणाहून आता देवेंद्र फडणवीस काम करणार आहेत.
काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेचच शिंदे – फडणवीस सरकार कामाला लागल्याचेही दिसून आले आहे. ठाकरे सरकारचा आदेश शिंदे – फडणवीस सरकारने फिरवलेला आहे. मेट्रोचे कारशेड ‘आरे’ इथेच होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे समजत आहे.
आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल असे असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे महाअधिवक्ता यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू कोर्टासमोर मांडावी असं त्यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच, जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव आणा असे निर्देशही फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.