दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा ‘दे धक्का’ चित्रपट अजूनही आपण विसरलेलो नाही. हास्य, विनोद आणि भावनिक पदर असलेल्या या चित्रपटाने आपलं पुरतं मनोरंजन केलं. या चित्रपटाचा दुसरा भागही यावा अशी चाहत्यांची इच्छा होती.
विशेष म्हणजे प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा देखील केली होती. पण करोना काळात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्तच मिळाला नाही. अखेर या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा झाली, महेश मांजरेकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘दे धक्का २’ चा टिजर शेअर केला आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी एक विडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘दे धक्का २’ मधील कलाकार आणि त्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये शिवाजी साटम , मेधा मांजरेकर , मकरंद अनासपूरे , सिद्धार्थ जाधव अशी तगडी स्टारकास्ट आहे. या विडिओला एक भन्नाट कॅप्शन त्यांनी दिले आहे.
‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय.. घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय.. १ २ ३ ४ “दे धक्का २” येतोय ५ ऑगस्ट २०२२ ला…’ अशा शब्दात त्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.या आधी गेल्यावर्षी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. तसेच चित्रपट रिलीज करण्याची तारीख ही जाहीर करण्यात आली होती.
१ जानेवारी २०२२ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता परंतु काही अडचणींमुळे तो पुढे ढकलण्यात आला. अखेर तो क्षण आला आहे. दे धक्का २ लवकरच रिलीज होणार या बातमीने प्रेक्षक आनंदी झाले आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘दे धक्का’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. आता ‘दे धक्का २’ मध्ये काय नवीन हंगामा बघायला मिळणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.