Maharashtra Politics : न्याय मिळाला की, सुप्रीम कोर्ट चांगले आणि विरोधात निकाल गेला की, सुप्रीम कोर्ट वाईट असे विरोधकांचे सुरू असते.
Nashik : बारसू रिफायनरीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बारसू रिफायनरीत गुंतवणूक करणारी सौदी कंपनी पाकिस्तानमध्ये प्रकल्प करत असल्याच्या चर्चेला फडणवीस यांनी काल (शुक्रवारी) विधानसभेत दुजोरा दिला. आदित्य ठाकरे यांनी नाणार असो की बारसू भाजप महाराष्ट्रद्वेषी असल्याचे वारंवार दिसून येत आहे, अशी टीका केली होती. या टीकेला फडणवीस शनिवारी प्रत्युत्तर दिले.
“आदित्य ठाकरे बारसू प्रकरणावर अभ्यास करून बोलतील असं वाटलं होते. पण त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. त्यामुळे विरोधाला विरोध करणाऱ्यांना उत्तर देऊन तरी काय फायदा होणार,” असा टोला फडणवीसांनी त्यांना लगावला. नाशिक येथील एका कार्यक्रमानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते
महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने फडणवीस नाशिक दौऱ्यावर होते. महाराष्ट्र पोलिस दल देशातील अतिशय प्रशिक्षित व शिस्तबद्ध पोलिस दल आहे. देशामध्ये आपल्या पोलिस दलाचा एक मोठा नावलौकिक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
बारसू रिफायनरीत गुंतवणूक करणारी सौदी या कंपनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्याना बेंगलोर मधून पैसे येत असल्याचा आरोप फडणीस यांनी केला. ग्रीनपीस या बंदी असलेल्या संघटनेच्या संपर्कातही आंदोलनकर्ते असल्याचे फडणवीस यांनी सांगितलं.
न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, यावर फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. “या प्रकारचा निकाल आल्यानंतर एका गोष्टीचे समाधान वाटते की, कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या घालणारे काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षाचे नेते सर्वोच्च न्यायालयाचे गुणगान करत आहेत. यातून आपल्याला न्याय मिळाला की, सुप्रीम कोर्ट चांगले आणि विरोधात निकाल गेला की, सुप्रीम कोर्ट वाईट असे विरोधकांचे सुरू असल्याचे दिसून येते,” असा टोला फडणवीसांनी लगावला. “सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांनी केलेले विधान अयोग्य ठरवले आहे. उच्चपदस्थ लोकांनी असे का म्हणू नये,हे ही स्पष्ट केले आहे,” असे फडणवीस यांनी नमूद केले.