Chandrashekhar Bawankule On Thackeray : ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर बोलण्याची लायकी नाही
Mumbai News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मस्टरमंत्री’ असा उल्लेख करत खिल्ली उडवली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभर ‘इंडियन मुजाहिद्दीन’चे प्रधानसेवक म्हणून जाता का, असा खोचक प्रश्न उपस्थित करून भाजप सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर ठाकरेंनी केलेल्या जहरी टीकेमुळे भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी वडिलांचा पक्ष न टिकवणाऱ्यांना मोदींवर बोलण्याची लायकी नाही. तसेच फडणवीस हे ‘मस्टरमंत्री’ नसून ‘मास्टरस्ट्रोक’ देणारे असल्याचे सांगून ठाकरेंना डिवचले
बावनकुळेंनी ट्विट करून ठाकरेंचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणतात भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचे भूमीपूजन झाले तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारने राज्यभर गुन्हे दाखल केले होते, हे तुम्ही विसरलात की काय?”
मुख्यमंत्री शिंदेंचे बंड म्हणजे शिवसेनेला मुक्त करणे असा टोलाही बावनकुळेंनी ठाकरेंना लगावला आहे. “तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकांनी मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला
ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर बोलण्याची लायकी नसल्याचा घणाघातही बावनकुळेंनी केला आहे. मोदींवरील टीकेवर बोलताना बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी नाही. त्यांनी देशाचे नाव जगभर उंचावले आहे. हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे.”
यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या स्ट्रोकचीही आठवण ठाकरेंना करून दिली. “तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना ‘मस्टर’मंत्री म्हणालात, मात्र ते मस्टरमंत्री नाही तर ‘मास्टर’ आहेत. त्यांच्या ‘मास्टरस्ट्रो’कमुळेच तुम्हाला घरी बसावे लागले.”
भाजपमध्ये अफजलखान आणि औरंगजेबाची वृत्ती दिसून येत असल्याची जहरी टीका ठाकरेंनी केली होती. यावर बावनकुळे म्हणाले, औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसले आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला, तसाच सुरूंग जनतेने तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो-उदो करत बसा.”