आता काहीच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. घरची काम, फराळ, फटाके, भेटवस्तू , सुगंधी उटणं , अभ्यंगस्नान कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर येतात ना .. खरतरं कोरोनाच्या महामारीनंतर पहिल्यांदाच एवढ्या उत्साहात निर्बंध नसताना दिवाळी साजरी होत आहे. चला तर मग जाणून घेऊया कुठे कुठे काय काय आहे ..
कोणते पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत?
दिवाळीचा सण जसजसा जवळ येतोय तशीच उत्सुकता देखील वाढली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे बाजारात देखील विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी आकाशकंदील आणि विविध रंगांच्या रांगोळ्या बाजारात दिसायला सुरुवात झाली आहे.
मुंबईच्या लालबाग येथील चिवडा गल्लीत दिवाळीसाठी लागणारे सर्व प्रकारचे फराळ उपलब्ध झाले आहेत. करंजी, लाडू, मिठाई, चकली,गोड शंकरपाळी, तिखट शंकरपाळी,भाजकी पोह्याचा चिवडा, नायलॉन चिवडा, जाड पोह्यांचा चिवडा, लसूण चिवडा, मिक्स चिवडा, नायलॉन शेव, गाठीया, तिखट शेव, लसूण शेव, गोल कचोरी, पास्ता क्रॅकर्स, साबुदाणा चिवडा, बेसन लाडू, इत्यादी पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. या वर्षी महागातला महाग पदार्थ हा भाजणीची चकली आहे. तर स्वस्तातला स्वस्त पदार्थ म्हणजे शंकरपाळी आहेत. चिवडा 200 ते 300 रुपये प्रति किलोच्या आत विकला जातोय. तसेच करंजी डझनच्या भावाने वेगवेगळी विकली जात आहे.
मुंबईच्या माहिममध्ये कागदांनी बनलेल्या आकाशकंदीलांची विक्री करण्यात येत आहे. विविध रगांच्या आकर्षक कंदीलांनी ग्राहकांची पावले या दुकानांकडे वळत आहेत.कंदीलांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आकाशकंदील, पणत्या, रोषणाईच्या माळ्या, दाराच्या रंगीबेरंगी तोरणांनी बाजार फुलला आहे. चिनी मातीच्या पणत्यांनीही बाजार सजला आहे. यावरील आकर्षक नक्षीकाम आणि रंगांची सजावट ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पुण्यामध्ये घरगुती पणत्या, आकाशकंदील पासून फराळापर्यंत सर्व गोष्टी बाजारात आल्या आहेत. शनिपार, तुळशीबाग , रविवार पेठ येथे विविध रंगांचे दिवे, पणत्या, रंग रांगोळी, आकाशकंदील दिसून येतात. तर, मंडईत देखील विविध प्रकारची फुले , तोरणे विकण्यासाठी सज्ज आहेत. याचबरोबर, बाजारात अभ्यंगस्नानासाठी खास शाहीस्नान आले आहे.
दिवाळीचा सण जसजसा जवळ येतोय तशीच उत्सुकता देखील वाढली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे बाजारात देखील विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी आकाशकंदील आणि विविध रंगांच्या रांगोळ्या बाजारात दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद आणि उत्साह अधिकच वाढत चालला आहे.