सध्या राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच पहिल्यांदाच मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी झालेली दिसून येत आहे. शिवडी जवळील फ्रीवेवर भला मोठा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरमध्ये आम्ही शिंदे साहेबांसोबत असं लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , धर्मवीर आनंद दिघे , शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे फोटो पहायला मिळत असून या बॅनरमधून चक्क उद्धव ठाकरे यांचा फोटो वगळला आहे.
विधानपरिषद निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाल्यानंतर संपूर्ण विधानपरिषदमध्ये शिंदे यांची चर्चा रंगली होती. शिवसेनेचे बडे नेते हे एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे भाजपच्या नेत्यांसोबत असल्याचे समोर आले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने काही ठिकाणी शिवसेनेकडून शिंदेंच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला गेला. तसेच काही ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी शिंदेंविरोधात निदर्शने देखील केली. याच दरम्यान शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर देखील ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत.