महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्याला तीन दिवस उलटून गेले असली तरी देखील आपण शिवसेनेसोबत असून शिवसेना सोडणार नसल्याचं शिंदेंकडून सांगण्यात येत आहे. मात्र शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत गद्दारी केल्याचा सुर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या बोलण्यातून समोर येत होता. त्यामुळे आता शिंदे नक्की काय भूमिका घेणार याकडे राज्यभरातील शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.
अशातच आता शिंदे आपली भूमिका जाहीर करणार असल्याची मोठी बातमी समोर येत असून यासाठी त्यांनी आज त्यांच्या गटाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर ते राज्यपालांना वेगळ्या गटाचं पत्र देणार असल्याचं समजतं आहे. शिवाय या सर्व पार्श्वभूमीवर हॉटेल रेडिसन ब्लू समोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून हॉटेल बाहेर हालचालींना वेग आला असल्याचं देखील सुत्रांनी सांगितलं आहे.