लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाच्या संघानं फिफा विश्वचषक 2022 उपांत्य फेरीत क्रोएशियाचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
FIFA World Cup ARG vs CRO : लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या अर्जेंटिनाच्या (Argentina) संघानं फिफा विश्वचषकाच्या (FIFA World Cup 2022) अंतिम फेरीत धडक मारली आहे. लुसाइल स्टेडियममध्ये झालेल्या विश्वचषकाच्या सेमीफायनल्समध्ये मंगळवारी रात्री उशिरा अर्जेंटिनानं क्रोएशियाचा (Croatia) 3-0 असा पराभव केला. अर्जेंटिनानं 2014 नंतर पहिल्यांदाच फिफाची फायनल गाठली आहे. आता अर्जेंटिना यंदाच्या विश्वचषकावर आपलं नाव कोरणारण्यात यशस्वी होणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आज मध्यरात्री सेमीफायनल्सचा दुसरा सामना फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात होणार आहे. विजेतेपदासाठी फायनल्समध्ये अर्जेंटिनाची लढत सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ फ्रान्स किंवा मोरोक्कोशी यांच्यात खेळवण्यात येईल. तर यंदाच्या फिफा विश्वचषकाची फायनल 18 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येईल. दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील हा 26 वा सामना असेल. मेस्सीनं फिफाचा सेमीफायनलचा सामना खेळून एक अनोखा विक्रम केला आहे. तो विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे.
पहिला गोल : 34व्या मिनटाला अर्जेंटिनाचा कर्णधार आणि दिग्गज फुटबॉलर कर्णधार लियोनेल मेस्सीनं पेनल्टीवर गोल केला
दुसरा गोल : 39व्या मिनटाला अर्जेंटिनासाठी ज्युलियन अल्वारेजनं गोल केला
तिसरा गोल : 69व्या मिनटाला अल्वारेजनं कर्णधार मेस्सीच्या पासवर दुसरा गोल केला
अर्जेंटिनाकडे तिसरा खिताब जिंकण्याची संधी
35 वर्षीय मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. अशा परिस्थितीत अर्जेंटिनाच्या संघाला यावेळी चॅम्पियन बनवण्यासाठी मेस्सी पूर्णपणे तयारीत आहे. यंदा अर्जेंटिनाकडे तिसरं विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. अर्जेंटिना जेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे. अर्जेंटिनानं आतापर्यंत 1978 आणि 1986 मध्ये दोनदा फिफाचं जेतेपद पटकावलं आहे.
मेस्सीनं वर्ल्डकपमध्ये रचला विक्रम
लिओनेल मेस्सीनं या विश्वचषकात आतापर्यंत तब्बल 5 गोल केले आहेत. यासह त्यानं फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेची बरोबरी केली आहे. आता मेस्सी आणि एम्बाप्पे गोल्डन बूटच्या शर्यतीत बरोबरीत आले आहेत. यासह मेस्सी विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 11 गोल करणारा खेळाडू बनला आहे. त्याने माजी दिग्गज फुटबॉलर गॅब्रिएल बतिस्तुताचा विक्रम मोडला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मॅराडोनाच्या नावावर वर्ल्डकपमध्ये 8 गोल आहेत. त्यामुळे सेमीफायनल्सच्या सामन्यात मेस्सीनं अनेक विक्रम केले आहेत. एकाच विश्वचषकात सर्वाधिक 5 गोल करणारा मेस्सी सर्वाधिक वय असणारा खेळाडू ठरला आहे.
फायनलमध्ये प्रवेश करताच मेस्सीनं रचला मोठा विक्रम
अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीनं सेमीफायनलचा सामना खेळून आणखी एक इतिहास रचला आहे. हा त्याचा विश्वचषकातील 25वा सामना होता. यासह मेस्सीनं सर्वाधिक विश्वचषक सामने खेळण्याच्या बाबतीत जर्मनीच्या लोथर मॅथॉसची बरोबरी केली आहे. आता अंतिम फेरीत प्रवेश केल्यानं मेस्सी मॅथॉसचा विक्रम मोडेल आणि विश्वचषकात सर्वाधिक 26 सामने खेळण्याचा विक्रम करेल.