France vs England : इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने ऐनवेळी केलेल्या एका चुकीमुळे इंग्लंडचा संघ फुटबॉल विश्वचषकातून बाहेर गेला.
FIFA World Cup 2022 : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील शेवटच्या सामन्यामध्ये गतविजेत्या फ्रान्सने इंग्लंडवर २-१ च्या फरकाने विजय मिळवत उपांत्य सामन्यातील आपले स्थान पक्कं केलं आहे. हे दोन्ही बलाढ्य संघ तब्बल ४० वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आमनेसामने आले होते. या सामन्यामध्ये अगदी ७८ व्या मिनिटाला फ्रान्सने केलेला गोल आणि इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने ऐनवेळी चुकवलेली पेनल्टीच्या संधीमुळे इंग्लंडचा स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.
सामन्यातील १८ व्या मिनिटालाच ऑरेलियन टिचोयुमेनीने फ्रान्सला १-० ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये अगदी नवव्या मिनिटाला इंग्लंडने १-१ ची बरोबरी केली. कर्णधार हॅरी केनने पेनल्टीचं रुपांतर गोलमध्ये करत संघाचं आव्हान कायम ठेवलं. मात्र ७८ व्या मिनिटाला पुन्हा फ्रान्सने आघाडी घेतली आणि हीच आघाडी निर्णायक ठरली. ऑलिव्हिएर जिरूडने फ्रान्सकडून दुसऱ्या गोल केला.
सामना संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना इंग्लंडला पेनल्टी मिळाली. मात्र कर्णधार हॅरी केनला या पेनल्टलीचं रुपांतर गोलमध्ये करता आलं नाही. केनकडून गोल करण्याची ही हुकलेली संधी सामन्यानंतरही समाजमाध्यमांवरही चांगलीच चर्चेत राहीली. अल बाएत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा चौथा आणि शेवटचा संघ फ्रान्स असेल, हे निश्चित झालं.
आता उपांत्य फेरीत, अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरक्को असे सामने रंगणार असून या दोन्ही सामन्यामधील विजेता संघ १८ तारखेला अंतिम सामन्यात जेतेपदासाठी आमने-सामने असतील.