ब्रह्मपुरी येथे कुणबी समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा व गुणवंतांचा सत्कार
ब्रम्हपुरी, प्रतिनिधी : संत तुकाराम महाराजांची शिकवण आजही समाजाला मार्गदर्शक आहे. ही शिकवण अंगीकारून जिद्द, चिकाटीच्या बळावर लक्ष विचलित न होऊ देता विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे. समाजाचे नावलौकिक करत आपल्या माता-पित्याचा मान वाढेल, असे आचरण युवकांनी ठेवावे. प्रशासकीय सेवेत भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हाच यशाचा मार्ग आहे. त्यामुळे उच्चशिक्षित होऊन कुणबी समाजातील युवक-युवतींनी समाजाला दिशा देण्यासाठी प्रशासनातील मोक्याची पदे काबीज करावे. व ज्यांना प्रशासकीय सेवेत संधी मिळाली त्यांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
अखिल कुणबी समाजाच्या वतीने ब्रम्हपुरी येथील स्वागत मंगल कार्यालयात आयोजित वधू-वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दामोधर मिसार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरीच्या तहसीलदार उषा चौधरी, अॅड. गोविंदराव भेंडारकर, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. सतीश दोनाडकर, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, माजी प्राचार्य भाऊराव राऊत, ज्ञानगंगा शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रमोद तोंडरे, बाजार समितीचे प्रशासक प्रभाकर सेलोकर, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेवक महेश भरें, खापणे, प्रा. शरद पाटील, डॉ. ज्योती दुपारे, प्रा. सुप्रिया तलमले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सुचित्रा ठाकरे, कंत्राटदार प्रेमलाल धोटे, नानाजी तुपट, नगरसेविका अंजली उरकुडे हे यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ. वडेट्टीवार म्हणाले की, वधू-वर मेळावे ही आजच्या काळाची गरज आहे. समाजासाठी निस्वार्थपणे योगदान देण्याचा विचार पुढे ठेवून मेळावा आयोजित करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. बाह्यरूपाला महत्त्व देण्यापेक्षा सारासार विचार केला तरच अनुरूप जोडीदार मिळुन उत्तम संसार होणे शक्य असते. कुणबी समाजाच्या आपण सदैव पाठीशी उभे असुन कुणबी समाज भवनाच्या निर्माणात आपणही सर्वतोपरी मदत करणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजाच्या हितासाठी तन-मन-धनाने समर्पित राहुन लागेल ते सर्वतोपरी सहकार्य आपण करणार. यावेळी स्पर्धा परीक्षेत व दहावी बारावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कुणबी समाज भवनासाठीच्या जागा खरेदीसाठी यावेळी कुणबी समाजातील अनेक दात्यांनी लाखो रुपयांचे आर्थिक दान दिले.