ब्रम्हपुरी येथे क्षेत्रीय आढावा बैठक संपन्न, सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
चंद्रपूर, प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारच्या काळात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील अनेक समस्यांना पूर्ण विराम देण्याहेतू कोट्यवधींचा विकासनिधी खेचून आणला. त्या विकासनिधी अंतर्गत मंजूर विकासकामे तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी दिले. ते ब्रम्हपुरी येथील विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीस अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आयोजित आढावा बैठकीस ब्रम्हपुरी उपविभागीय अधिकारी संदिप भस्के, तहसिलदार उषा चौधरी, नगराध्यक्ष रीता उराडे, बांधकाम सभापती विलास विखार, मुख्याधिकारी अर्शिया जुही तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्यांतील सर्व विभागाचे अधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ब्रम्हपुरी शहरांतील सुशोभीकरण, नळ योजना, प्रलंबित विकासकामे तसेच आवश्यक असलेल्या तथा मंजूर निधी बाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. तर सिंदेवाही व सावली तालक्यांत प्रलंबित पाणीपुरवठा योजना, रस्ते विकास, पांदन रस्ते, शेतकऱ्यांच्या समस्या, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, पाणी टंचाई निर्मूलनासाठी मंजूर करावयाचा बहुत आराखडा, सिंचन सोयी सुविधा, तसेच इतर महत्वपूर्ण अत्यावश्यक बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राकरीता कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधी अंतर्गत मंजूर कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी तसेच सत्तांतरामुळे अडलेली कामे लवकरच मंजुर होणार असून या संदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सोबतच प्रलंबित विकासकामे करण्याकरिता त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी माजी मंत्री वडेट्टीवार यांनी दिले. यावेळी महसूल, वनविभाग, पाटबंधारे विभाग, पंचायत समिती विभाग, पाणी पुरवठा विभाग, वीजवितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.