पुणे, 29 मार्च : भाजपचे जुने नेते आणि पुण्याच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होतं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भाजपने पुण्यात मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
गिरीश बापट आणि पुणे हे भाजपसाठी समीकरण बनलं होतं. गिरीश बापट यांनी जवळपास 30वर्षे कसबा मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर सध्याचे पुणे शहराचे ते विद्यमान खासदार होते. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारा नेता अशी गिरीश बापट यांची ओळख आहे. गिरीश बापट हे १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. १९९६ मध्ये त्यांना भाजपने खासदारकीची उमेदवारी दिली होती. मात्र बापट यांचा काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पराभूत केलं होतं.
(Girish Bapat : भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन)
तुमच्या शहरातून (पुणे)
गिरीश बापट हे मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. जनसंघापासून ते जोडलेले होते. आधी नगरसेवक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली होती. 1995 पासून ते सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2029 ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा पराभव केला होता.
गिरीश बापट यांच्याबद्दल…
गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला होता. त्यांनी तळेगाव दाभाडे इथं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. 1973 मध्ये ते टेल्को कंपनीमध्ये त्यांनी नोकरी केली. दोन वर्षांतच ते आणीबाणीमध्ये दीड वर्ष त्यांनी तरुंगवास भोगला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी संघ परिवारामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलं.
(कसब्यातल्या भूकंपाचे भाजपमध्ये पडसाद, चंद्रकांत पाटलांच्या विधानावर टिळकांची नाराजी!)
राजकारणात एंट्री
1983 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पुणे महापालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पुढे ते 3 टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले. बापट यांचा जनसंपर्क मोठा होता. 1995 मध्ये त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली. त्यानंतर सलग 5 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. आमदारकी लढवल्यानंतर त्यांनी 1996 मध्ये खासदारकीसाठी नशीब आजमावलं. पण पहिल्याच प्रयत्नात त्यांचा पराभव झाला. काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. पण भाजपने अनिल शिरोळे यांना संधी दिली. त्यामुळे बापट यांची संधी हुकली. पुढे त्यांनी 2019 मध्ये बापट यांना संधी मिळाली आणि काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव करत खासदारकी पटकावली.
मंत्री आणि खासदार
2014 साली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री केले गेलं. सोबतच पुण्याचं पालकमंत्री पदही त्यांना देण्यात आलं होतं. गेले पाच वर्षे त्यांनी पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतिनिधित्व केले. पण गेल्या काही महिन्यापासून प्रकृती खालावली होती. बापट हे दांडगा जनसंपर्क असणारे नेते होते. कसबा मतदारसंघावर त्यांची मोठी पकड होती. त्यामुळे पुण्यात बापट यांना मानणणारा मोठा वर्ग होता. अलीकडे झालेल्या पोटनिवडणुकीतही बापट यांनी अखेरच्या क्षणाला प्रचार केला होता. प्रकृती ठीक नसतानाही बापट यांनी प्रचाराला हजेरी लावली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.