Kolhapur : जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीपैकी केदारलिंगवाडी हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 10 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला.
Kolhapur Leopard Attack : जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील (Shahuwadi Taluka) उदगिरीपैकी केदारलिंगवाडी हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 10 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनीषा डोईफोडे (वय 10, रा. केदारलिंगवाडी, ता. शाहूवाडी) असे हल्ल्यातील मृत मुलीचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे व गावात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील पुसाळे येथील बाबाजी डोईफोडे हे गेल्या चार महिन्यांपासून कुटुंबासह उदगिरीपैकी केदारलिंगवाडी येथे राहत आहेत. त्यांची पत्नी आणि मुलगी बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास जनावरांना चरण्यासाठी घेऊन निघाल्या होत्या. केदारलिंग वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर जनावरांच्या मागे असलेल्या मनीषा डोईफोडे या मुलीला बिबट्याने झडप मारून पकडले. काही अंतर पुढे गेल्यावर मुलीचा आवाज येत नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. आईने मुलीचा शोध सुरू केल्यानंतर काही अंतर मागे गवतात मुलीला ओढून नेणारा बिबट्या दिसला. आरडाओरडा करताच बिबट्या जंगलात पळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण बिबट्याने मान पकडल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. या परिसरात बिबट्यांची दहशत वाढली असून, त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. चांदोली अभयारण्यापासून जवळच हा परिसर असल्यामुळे येथे बिबट्यांचा वावर वाढला आहे.