सोनीपत, 18 एप्रिल : तुम्ही रात्री गुगल मॅपद्वारे तुम्हाला जिथे जायचंय त्याठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हरियाणाच्या सोनीपतमधून जाणाऱ्या सर्व वाहन चालकांनी काळजी घ्यावी, कारण याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोनीपतमधील गोहाना बायपास रोडवर रात्री उशिरा झज्जरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाला तीन सशस्त्र बदमाशांनी लुटले. मात्र, कारचालक संदीपने विनंती केल्यावर तिघांनी त्याच्या दोन्ही मुलींना सुखरूप सोडले. पण त्याची कार आणि रोकड लुटून पळ काढला. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झज्जर जिल्ह्यातील कव्वाली गावात राहणारा संदीप पत्नी आणि दोन मुलींसह कर्नालमध्ये एका लग्न समारंभात सहभागी होऊन कारने झज्जरला परतत होता. मात्र, त्याने झज्जरला जाण्यासाठी आपला पत्ता गुगल मॅपवर टाकला. फोनमधील खराब नेटवर्कमुळे गुगल मॅपमध्ये त्याचा रस्ता चुकला आणि तो आपल्या कुटुंबासह गोहाना बायपास रोडवरील कामी चौक गावात पोहोचला.
तो भरकटत चालला आहे असे वाटल्याने त्याने दुचाकीवरील तीन तरुणांना झज्जरचा रस्ता विचारला, मात्र त्याला रस्ता दाखवण्याऐवजी तिघांनीही गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर तिघांनीही बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या पत्नीला खाली उतरवले तसेच गाडी घेऊन फरार होऊ लागले. मात्र, यावेळी संदीपने तिघांना आपल्या दोन्ही मुलींनाही गाडीतून खाली उतरवण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी संदीपच्या दोन्ही मुलांना कारमधून खाली उतरवले आणि गाडीसह रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच सोनीपत पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडित कुटुंबाला पोलिस ठाण्यात आणले. यानंतर पीडित संदीपच्या तक्रारीवरून तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध दरोड्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलबाग सिंग यांनी सांगितले की, रात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी संदीप आणि त्याच्या कुटुंबाला गोहाना बायपास रोडवरील कामी चौक गावाजवळ लुटले. फरार लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.