नेरमध्ये ट्रॅक्टरचा अपघात; विटांखाली दबलेल्या मजुरांची केली सुटका
यवतमाळ, प्रतिनिधी : नेर येथून मांगलादेवीकडे विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा टायर फुटल्यामुळे ती अचानक पलटी झाली. त्यामुळे वर बसलेले कामगार या विटांच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेले. दरम्यान, गजानन महाराज प्रकटदिनाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री संजय राठोड हे त्याच मार्गाने मांगलादेवीला जात होते. त्यांच्यासमोर अपघात घडताच त्यांनी तत्काळ विटांच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना मोकळे करत त्वरित उपचारासाठी रूग्णालयात रवाना केले. ही घटना सोमवारी (दि. १३) दुपारी तीनच्या दरम्यान घडली.
सोमवारी दुपारी तीन दरम्यान नेर येथून चिखली कान्होबा येथे विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर जात होता. दरम्यान, मांगलादेवीच्या अलीकडे सदर ट्रॅक्टरचा टायर फुटल्यामुळे तो पलटी झाला. ट्रॅक्टरवर बसणारे मजूर सलाउल्ला खान नाजिम खान व एजाज शेख (दोघेही वय ३५) हे विटाखाली दबले गेले. दरम्यान, त्याचवेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे मांगलादेवी येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात होते. त्यांच्या समोरच हा अपघात काही क्षणाआधी झाला होता. त्यांनी आपला ताफा थांबवत घटनास्थळी धाव घेतली व विटांखाली दबलेल्या मजुरांना आपल्या सुरक्षारक्षक व पोलिसांकरवी बाहेर काढले. याचवेळी जखमींना तत्काळ आपल्या ताफ्यातील वाहनात बसवून उपचारासाठी नेर येथे रवाना केले. नेर येथील दवाखान्यातील सर्व यंत्रणा तत्काळ अलर्ट करून जखमींवर प्रथमोपचार करण्यात येवून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रवाना करण्यात आले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक व पोलिसांसह गावातील कैलास परोपटे, हरीश लांजेकर, गणेश बेले, विजय बारस्कर, रंजीत महल्ले, हनुमंत नाल्हे, विलास मेश्राम आदींनी अपघातग्रस्तांना मदत केली.