मुंबई 01 मे : ऑटो सेक्टरमधील मोठं नाव महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे अध्यक्ष उद्योगपती आनंद महिंद्रा यांचा आज (1 मे) वाढदिवस. सोशल मीडियावर हटके कल्पनांचं कौतुक करणारे आनंद महिंद्रा सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा ग्रुपचे नाव भारतातील टॉप कंपन्यांमध्ये गणले जाते. हार्वर्ड बिझनेस स्कूल (एचबीएस) येथून एमबीए पूर्ण केलेल्या आनंद महिंद्रा यांनी त्यांचा व्यवसाय कसा पुढे नेला? महिंद्रा समूहाची एक खास ओळख कशी निर्माण केली? व्यवसायाची झपाट्यानं वाढ करून मोठ्या प्रमाणात नफा कसा कमावला? याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि टेक महिंद्रा लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 1 मे 1955 रोजी झाला. त्यांनी महिंद्रा समूहाला एका उंचीवर नेलं आहे. महिंद्रा समूहानं ऑटोमोबाईल्स, शेतीपासून ते आयटी आणि एरोस्पेसपर्यंतच्या 22 प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार केलाय. आनंद महिंद्रा हे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांचे वर्गमित्रही राहिलेत. त्यांना जानेवारी 2020 मध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ प्रदान करण्यात आला. ते महिंद्रा कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील आहेत.
मॅनजेमेंट ट्रेनी म्हणून झाले रुजू
फोर्ब्सनुसार, आनंद महिंद्रा यांची संपत्ती सध्या 2.1 अब्ज डॉलर म्हणजेच 17,166 कोटी रुपये आहे. ते 19 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर 1981 मध्ये ते महिंद्रा यूजीन स्टील कंपनी लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले होते, व तेथूनच त्यांची महिंद्रा ग्रुपमधील प्रवासाची सुरुवात झाली. 1989 मध्ये ते महिंद्रा यूजीन स्टील कंपनी लिमिटेडचे संचालकही बनले. तर, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत त्यांचा प्रवास 1991 मध्ये डेप्युटी एमडी म्हणून सुरू झाला.
स्कॉर्पिओनं बदललं नशीब
आनंद महिंद्रा यांचे शालेय शिक्षण लॉरेन्स स्कूलमधून झाले. ते हार्वर्ड विद्यापीठ आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात फिल्म मेकिंग आणि आर्किटेक्चरचा अभ्यास केला, व हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महिंद्रा ग्रुपमध्ये स्वतःचा प्रवास सुरू केला. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अनेकांचं नशीब बदललं, पण त्यांचं नशीब बदलण्याचं श्रेय एसयूव्ही स्कॉर्पिओला जातं. महिंद्रा कंपनीनं 2002 मध्ये आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली स्कॉर्पिओ ही पहिली एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत सादर केली. ही गाडी ग्रामीण भागासह शहरी भागात लोकप्रिय झाली. अनेकांनी ती आवडली.
Success Story : 2 Computer भाड्याने घेऊन सुरू केला व्यवसाय, आता अंकिता वर्षाला कमावते तब्बल 100 कोटी
स्कॉर्पिओचं यश पाहून हॉवर्ड विद्यापीठानं या गाडीचा केस स्टडी म्हणून समावेश केला. स्कॉर्पिओ प्रमाणे बोलेरोलाही प्रचंड यश मिळालं. आता महिंद्रा कंपनीच्या गाड्यांना ग्रामीण भारतात तसेच, शहरांमध्येही प्रचंड मागणी आहे. ट्रॅक्टर असो की बाईक, कार किंवा इतर कोणतेही वाहन, प्रत्येक वेळी महिंद्रांच्या गाड्यांची विचारणा केली जाते. आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली कंपनी सतत प्रगतीच्या मार्गावर आहे.
पत्नी आहे पत्रकार
महिंद्रा कंपनी भारतात ऑफ रोड वाहनं आणि ट्रॅक्टर्सच्या उत्पादनासाठी ओळखली जाते. भारतातील प्रसिद्ध बहुराष्ट्रीय महिंद्रा समूहाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. सध्या या समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आहेत. सीईओ ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित आनंद महिंद्रा यांचे वडील हरीश महिंद्रा एक उद्योगपती होते, आणि त्यांची आई इंदिरा महिंद्रा गृहिणी होत्या. आनंद महिंद्रा यांना अनुजा शर्मा आणि राधिका नाथ अशी दोन भावंडे आहेत. आनंद यांच्या पत्नीचं नाव अनुराधा महिंद्रा आहे. अनुराधा एक पत्रकार आहेत, ज्या ‘लाइफस्टाइल’ मासिकाच्या संस्थापक संपादिका आणि प्रकाशक आहेत.
सोशल मीडियावर असतात सक्रिय
आनंद महिंद्रा हे असे उद्योगपती आहेत, ज्यांनी केवळ स्वतःच्या मेहनती आणि परिश्रमाच्या जोरावर आपला व्यवसाय वाढवला नाही, तर त्यांच्या कंपन्यांच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देण्यासही मागे हटले नाहीत. महिंद्रा यूजीन स्टील कंपनी लिमिटेडमध्ये वित्त संचालकांचे कार्यकारी सहाय्यक म्हणून करिअरची सुरुवात करणारे आनंद महिंद्रा काही वर्षांनी याच कंपनीचे अध्यक्ष आणि उपव्यवस्थापकीय संचालक बनले. आनंद महिंद्रा यांची काम करण्याची पद्धत सर्वांनाच आवडते. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेक मनोरंजक व्हिडिओ शेअर करतात. ट्विटरवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. आनंद महिंद्रा त्यांच्या चाहत्यांना निराशही करत नाहीत, चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरही देतात. अनेकदा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदतही करतात. तसेच, नेटकऱ्यांनी शेअर केलेल्या हटके कल्पनांचे तोंडभरून कौतुकही करतात. यामुळेच ते सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचंड प्रसिद्ध आहेत.
आज आनंद महिंद्रा यांचा 68वा वाढदिवस असून भारतातील उद्योगक्षेत्रात मोठं योगदान असणाऱ्या महिंद्रा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.