कोलकाता पोलिसांनी अखिल भारतीय हिंदू महासभेच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोलकात्यात हिंदु महासभेने उभारलेल्या दुर्गापुजेत महात्मा गांधीजी यांच्यासारखा दिसणाऱ्या राक्षसाच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर पोलिसांनी तो पुतळा हटवला. यानंतर तिथे दुसरा पुतळा बसवला गेला. देवी दुर्गा आसुरांचा वध करून पृथ्वीला वाचवत असल्याचा देखावा करण्यात आला आहे. त्यात महिषासुराचा पुतळा दाखवताना त्याचा लूक हा गांधीजींसारखा करण्यात आल्याचे म्हटले गेले. देशात रविवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जात असताना दुसऱ्या बाजूला हा प्रकार समोर आला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तो पुतळा हटवला. त्यानतंर या प्रकरणी काही तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दक्षिण कोलकात्यातील कसबा पोलिसांनी दिली. गांधीजींना राक्षस रुपात दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी यात कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंद केला याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.
पोलिसांनी म्हटलं की, “तपास अधिकारी सध्या इथे नसल्यानं याबाबत सविस्तर माहिती देता येणार नाही, तेच तुम्हाला माहिती देऊ शकतील.” दरम्यान, अखिल भारतीय हिंदु महापरिषदेचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी यांनी मात्र कोणता गुन्हा दाखल झालाय याबद्दल माहिती नसल्याचं म्हटलं आहे. आम्हाला कुणी संपर्क केला नाहीय आणि आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, सदस्याला अटक झालेली नाही असंही गोस्वामी यांनी सांगितले.
काँग्रेस नेते कौस्तुभ बागची यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तक्रारीची एक प्रत पाठवत पत्रही लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, माझ्या माहितीनुसार सोमवारी दुपारपर्यंत याविरोधात अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. यावर अनेक पक्षांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. गांधीजींना राक्षस स्वरुपात दाखवण्याचा यामागे उद्देश होता असा दावाही बागची यांनी केला.