Flight Land on Highway : युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणतेही लढाऊ विमान आता महामार्गावरही उतरवता येणार आहे.
IAF Flight Land on Highway : आता कोणत्याही युद्धजन्य किंवा आपातकालीन परिस्थितीमध्ये लष्कराचे कोणतेही लढाऊ विमान महामार्गावर (Highway) उतरवता येणार आहे. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) याची महत्त्वाची अशी चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) प्रकाशम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 16 वर (NH16) गुरुवारी लष्कराच्या लढाऊ विमानांचे ट्रायल लँडिंग (IAF Fighter Aircraft) करण्यात आले. त्यामुळे भविष्यात परिस्थिती उद्भवल्या रनवेऐवजी महामार्गावर लढाऊ विमानांचे लँडिग करता येणार आहे.
रनवेऐवजी महामार्गावर उतरलं लढाऊ विमान
भारतीय हवाई दलाने गुरुवारी आंध्र प्रदेशातील बापटला येथे राष्ट्रीय महामार्ग 16 वर नव्याने बांधलेल्या 4.1 किमी इमर्जन्सी लँडिंग सुविधेची (ELF) चाचणी घेतली असून ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ (IAF Fighter Jet) आणि वाहतूक विमानांनी (IAF Transport Aircraft) या चाचणी आणि सरावामध्ये भाग घेतला होता. सुखोई आणि तेजस एलसीए लढाऊ विमानांनी महामार्गावरील इमर्जन्सी लँडिंग सुविधेच्या चाचणीत भाग घेतला. लढाऊ विमानांनी 100 मीटर उंचीवर उड्डाण केले. त्यानंतर महामार्गावर यशस्वीरित्या इमर्जन्सी लँडिंग केला आणि नंतर पुन्हा विमानांनी आकाशात उड्डाण केले.
हवाई दलाची यशस्वी चाचणी
भारतीय हवाई दलाने (IAF) ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटीमध्ये लिहिलं आहे की, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि वाहतूक विमानांनी 29 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात NH-16 वर नव्याने बांधलेल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी ठरली आहे. शिवाय या चाचणीवेळी सर्किट ऍप्रोच आणि ओवरशूट या तंत्रज्ञानाचा सराव करण्यात आला.