मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अनेक मान्यवरांची हजेरी; १० लाख समाजबांधव राहणार उपस्थित
यवतमाळ, प्रतिनिधी : देशभरातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी (पोहरागड) येथे १२ फेब्रुवारीला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून संत सेवालाल महाराजाच्या अश्वारूढ पुतळयाचे अनावरण व १३५ फुट उंचीचा देशातील सर्वात मोठ्या सेवाध्वजाची स्थापना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळयाला देशभरातून १० लाख समाजबांधव उपस्थिती असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हा बँकेचे संचालक राजुदास जाधव, डॉ. टी. सी. राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने ३ डिसेंबर २०१८ रोजी भव्य नगारा वास्तु संग्रालयाचे भूमिपुजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते पार पडले होते. सदर वास्तुचे काम सद्या अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान पोहरादेवी व उमरीगड या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाने ५९३ कोटी रूपये मंजुर केले आहे. यामध्ये तीर्थक्षेत्र विकासासाठी ३२६ कोटी, संत रामराव महाराज उद्यानासाठी २०० कोटी व नगारा वास्तु संग्राहलयाच्या उर्वरित कामासाठी ६७ कोटी रूपये शासनाने मंजुर करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.
सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा मंत्रीमंडळातील बहुसंख्य मंत्री तसेच देशातील बंजारा समाजाचे सर्वपक्षीय खासदार, आमदार व लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहे. सोबतच समाजाचे सर्व महंत सुध्दा याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजातील विचारवंत, कवी, गायक, नायक, कारभारी, सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेत आहे. तरी या ऐतिहासिक सोहळयाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने राजुदास जाधव, डॉ. टी. सी. राठोड यांनी पत्रकार परिषदेतून केले. यावेळी आसाराम चव्हाण, महेश पवार, अश्विन जाधव, अक्षय राठोड आदी उपस्थित होते.
देशातील चार मार्गाने येणार महाराजांची रथयात्रा
या कार्यक्रमाच्या आधी देशातील चार मार्गाने सेवादास महाराजांची रथयात्रा सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमधील भायागड, आंध्रप्रदेशमधील सेवागड, मुंबई येथील सांताकृझ व मध्यप्रदेशातील शिवाबाबा गड अशा चार राज्यांतून ही रथयात्रा सुरू आहे. रथयात्रेच्या मार्गावर समाजबांधवांकडून रथयात्रेचे प्रचंड स्वागत करण्यात येत असून ही रथयात्रा ११ फेब्रुवारीला वेगवेगळ्या चार मार्गाने पोहरादेवी येथे पोहचणार आहेत.
पंचधातुच्या २१ फुट अश्वारुढ पुतळ्याची निर्मिती
भारतातील बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातुच्या २१ फुट अश्वारूढ पुतळ्याची निर्मिती यवतमाळ येथेच केली जात आहे. पुतळा घडविताना सोने, चांदी, तांबे, पितळ व इतर मौल्यवान धातुंचा समावेश राहणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांचा पुतळा यवतमाळ येथून पोहरादेवी येथे नेण्यास प्रारंभ होणार आहे. त्यासाठी समाजातील २ हजारांपेक्षा जास्त युवक बाईक रॅली काढणार असून पारंपारीक वाद्यवृंदाचा संच पोहरादेवीपर्यंतच्या प्रवासात सहभागी होणार आहेत.
बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्या मांडणार
यावेळी डॉ. टी. सी. राठोड यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळातील बहुसंख्य मंत्री या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याने बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्या याप्रसंगी मांडण्यात येणार आहे. या मागण्यांमध्ये आरक्षण, नॉनक्रिमिलीयर, तांडा विकास महामंडळ, आदी २१ मागण्यांचा समावेश असेल. बंजारा समाजाच्या दृष्टीने हा सोहळा एक ऐतिहासिक ठरणार आहे.