मुंबई, 24 मे : आयपीएल 2023च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या गुजरात टायटन्सला हरवून थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने दहाव्यांदा आयपीएलची फायनल गाठलीय. यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याच्या आधीपासूनच धोनीचे हे शेवटचे आयपीएल असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पहिला क्वालिफायर सामना जिंकल्यानंतर धोनीला याबाबत विचारले असता त्याने उत्तर दिलं. धोनी म्हणाला की, मला नाही माहिती पुढच्या वर्षी माझे पुनरागमन होईल की नाही. पण एक गोष्ट नक्की आहे मी नेहमीच सीएसकेसाठी तयार असेन.
यंदाच्या आय़पीएलमध्ये गुजरात टायटन्सने 14 पैकी दहा सामन्यात विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं. त्यांना हरवून चेन्नई सुपर किंग्जने फायनल गाठली. पोस्ट मॅच प्रेजेंटेशनमध्ये हर्षा भोगलेंनी धोनीला विचारलं की, पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये पुन्हा दिसणार का? या प्रश्नावर उत्तर देताना धोनी म्हणाला की, मला नाही माहिती. यावर निर्णय घेण्यासाठी सध्या 8 ते 9 महिन्यांचा कालावधी आहे. डिसेंबरमध्ये मिनी ऑक्शन होईल. त्यावेळी समजेल की माझा निर्णय काय आहे.
IPL 2023 : चेन्नईच ‘सुपरकिंग’, गुजरातला हरवत धोनी ब्रिगेडची आणखी एका फायनलमध्ये धडक!
आतापासूनच डोकेदुखी कशासाठी घ्यायची. मी नेहमीच सीएसकेसाठी तयार असेन. मग मी खेळेन किंवा बाहेर राहून संघासोबत असेन असं म्हणत धोनीने निवृत्तीचे संकेतही दिले आहेत. धोनी जुलैमध्ये 42 वर्षांचा होईल. यंदाच्या हंगामात गुडघ्याला दुखापत असूनही तो खेळताना दिसला. या वयातही तो फिट असून किमान एक वर्षभर तो खेळू शकतो असंही म्हटलं जातंय. मात्र, याआधी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यामुळे आताही तो कधी निर्णय घेईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
धोनीने आयपीएलमधून निवृत्तीच्या प्रश्नावर बोलताना 8 ते 9 महिन्यांचा कालावधी असल्याचं सांगितलं. डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन होणार आहे. त्याआधी संघांकडून खेळाडूंना रिटेन आणि रिलीज केलं जातं. यावेळी चेन्नई धोनीला रिटेन करणार की नाही हे स्पष्ट होईल आणि तेव्हाच धोनी पुढच्या हंगामात खेळणार का या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळेल. धोनीला चेन्नईने रिटेन केलं नाही तर 28 मे ला होणारा अंतिम सामना धोनीचा आयपीएलमधला अखेरचा सामना ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.