मुंबई, 03 एप्रिल : आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला. रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव यांसारखे फलंदाज अपयशी ठरले, पण २० वर्षांच्या तिलक वर्माने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या तिलक वर्माने ४६ चेंडूत नाबाद ८४ धावा केल्या. आपल्या या डावात तिलकने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. तिलक वर्माने महेंद्र सिंह धोनीच्या स्टाइलमध्ये षटकार मारत मुंबई इंडियन्सच्या डावाचा शेवट केला. जर तिलक वर्माने ८४ धावा केल्या नसत्या तर मुंबई इंडियन्सच्या संघाला १७१ धावांपर्यंत मजल मारता आली नसती.
तिलक वर्माचा हा दुसरा आयपीएल हंगाम आहे. २०२०च्या अंडर १९ वर्ल्ड कप फायनल खेळणाऱ्या संघात तिलक वर्मा होता. २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला मुंबई इंडियन्सने १.७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. पदार्पणातच तिलक वर्माने मुंबई इंडियन्सचा निर्णय सार्थ ठरवला होता.
VIDEO : आर अश्विन करत होता मांकडिंगचा प्रयत्न, पंचांनी मधेच अडवलं आणि….
आयपीएल २०२२ मध्ये तिलक वर्माने १४ सामन्यात ३६ च्या सरासरीने ३९७ धावा केल्या होत्या. यात १६ षटकार आणि २९ चौकारांचा समावेश होता. यामुळेच मुंबई इंडियन्सने तिलक वर्माला आयपीएल २०२३ मध्ये रिटेन केलं होतं.
तिलक वर्माचे वडील व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होते. तिलकला क्रिकेटपटू करण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. तिलकसाठी क्रिकेट किट आणायला त्यांना कुणाकडून तरी पैसे उधारीने घ्यावे लागत होते. एक वेळ तर अशी आली की वडील आर्थिक संकटात होते आणि तिलकला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षक सलाम बायश यांनी मदतीचा हात पुढे केला होता.
तिलकने मुंबई इंडियन्समध्ये निवड झाल्यानतंर एका मुलाखतीत प्रशिक्षक सलाम बायश यांच्याबद्दल सांगितलं होतं. प्रशिक्षकांनी क्रिकेट किट देण्यासोबत मार्गदर्शनही केलं. तसंच सोबत राहण्याची आणि खाण्याची सोयही केली होती. तिलक आजही प्रशिक्षकांनी केलेली ही मदत विसरलेला नाही. जेव्हा तो त्याच्या यशाबद्दल सांगतो तेव्हा प्रशिक्षकांचा उल्लेख करणं विसरत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.