मुंबई, 8 एप्रिल : आयपीएल 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरूच आहे. आरसीबीनंतर आता सीएसकेनेही मुंबईचा दारूण पराभव केला आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईची बॅटिंग पुन्हा एकदा अपयशी ठरली. 20 ओव्हरमध्ये मुंबईने 8 विकेट गमावून 157 रन केले. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने 18.1 ओव्हरमध्येच केला.
चेन्नईच्या या विजयामध्ये तीन मराठी खेळाडू शिल्पकार ठरले. तुषार देशपांडेने सुरूवातीलाच रोहित शर्माला बोल्ड केलं, यानंतर धोकादायक टीम डेव्हिडची विकेटही तुषार देशपांडेनेच काढली. रोहित शर्मा 13 बॉलमध्ये 21 तर टीम डेव्हिड 22 बॉलमध्ये 31 रन करून आऊट झाला.
आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या चेन्नईला मुंबईने सुरूवातीलाच पहिला धक्का दिला. जेसन बेहरनडॉर्फने डेवॉन कॉनवेला बोल्ड केलं, यानंतर अजिंक्य रहाणेने मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. रहाणेने 225.93 च्या स्ट्राईक रेटने 27 बॉलमध्ये 61 रनची वादळी खेळी केली, यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. आयपीएल 2023 मधलं हे सगळ्यात जलद अर्धशतक होतं. 19 बॉलमध्येच रहाणेने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं.
अजिंक्य रहाणे आक्रमक खेळत असताना त्याला ऋतुराज गायकवाडने चांगली साथ दिली. ऋतुराजने 36 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले.
चेन्नईने मुंबईवर मिळवलेल्या या विजयात तुषार देशपांडे, अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड या तीन मराठी खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक क्रिकेटमध्ये तुषार देशपांडे आणि अजिंक्य रहाणे मुंबईकडून तर ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राकडून खेळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.