मुंबई, 9 एप्रिल : आयपीएलच्या नव्या मोसमाला सुरूवात झाली आहे. मोसमाच्या सुरूवातीलाच काही टीमनी धमाका केला आहे, तर काही टीम अजूनही संघर्ष करताना दिसत आहेत. दिल्ली कॅपिटल्सला या मोसमात लागोपाठ 3 पराभवांचा सामना करावा लागला आहे. दिल्लीच्या या कामगिरीमुळे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग नाराज झाला आहे. दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नरने दोन सामन्यांमध्ये अर्धशतकं केली, पण तरीही सेहवागने त्याच्या खेळीवर नाराजी व्यक्त केली आहे. वॉर्नर परिस्थितीनुसार रन करत नसेल, तर त्याने आयपीएल खेळण्याची गरज नाही, असं सेहवाग म्हणाला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात वॉर्नरने संथ खेळी केली, त्यामुळे सेहवाग संतापला.
दिल्लीला राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. वॉर्नरच्या टीमला 200 रनच्या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही, त्यामुळे दिल्लीचा मोसमातला लागोपाठ तिसरा पराभव झाला. वॉर्नरने राजस्थानविरुद्ध 55 बॉलमध्ये 65 रनची खेळी केली, यात त्याचा स्ट्राईक रेट 118 चा होता. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा 57 रननी पराभव झाला.
वॉर्नर तू ऐकत असशील तर प्लीज चांगला खेळ. 25 बॉलमध्ये 50 रन कर. जयस्वालने 25 बॉलमध्ये अर्धशतक केलं, जर तू असं करू शकत नसलशील तर इकडे येऊन आयपीएल खेळणं बंद कर, असं सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला. वॉर्नरने माझं बोलणं ऐकलं तर कदाचित त्याला वाईट वाटेल, अशी प्रतिक्रियाही सेहवागने दिली.
सेहवागने वॉर्नरच्या रणनितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दिल्लीने सुरूवातीच्या सामन्यांमध्ये हिटर्सना खेळवलं नाही. वॉर्नर 55-60 रनच्या खेळीपेक्षा 30 रन करून आऊट झाला असता, तर बरं झालं असतं. रोव्हमन पॉवेल आणि इशान पोरेल सारख्या खेळाडूंना सुरूवातीलाच संधी दिली गेली पाहिजे होती. या खेळाडूंसाठी कमी बॉल शिल्लक राहिले होते. हे खेळाडू मोठे शॉट मारू शकतात, असं सेहवाग म्हणाला.
सेहवागच्या या मतावर रोहन गावसकरनीही सहमती दर्शवली. वॉर्नर कर्णधार नसता तर तो रिटायर्ड हर्ट झाला असता, त्याच्याऐवजी एखादा भारतीय खेळाडू असता तर त्याच्यासाठी स्पर्धा संपली असती, असं रोहन गावसकर म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.