मुंबई, 25 मे : आयपीएलचा 16 वा मोसम शेवटच्या टप्प्यात आला आहे. या मोसमामध्ये टीम इंडियाच्या निवड समितीला बऱ्याच खेळाडूंचा पर्याय उपलब्ध झाला आहे, यामध्ये आकाश मढवाल याचाही समावेश होऊ शकतो. 29 वर्षांच्या आकाश मढवालला मुंबईने फक्त 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. आकाशने 2 सामन्यांमध्येच धमाकेदार कामगिरी करत पुढच्या मोसमांमध्ये आपण कोट्यवधींमध्ये खेळणार असल्याचं दाखवून दिलं. नॉकाआऊटच्या सामन्यात मढवालने भेदक बॉलिंग करत लखनऊची कंबर मोडली आणि मुंबईला विजय मिळवून दिला.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट घेतल्यानंतर आकाश मढवाल प्रकाशझोतात आला. यानंतर लखनऊविरुद्ध त्याने 5 विकेट घेत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. मढवालने फक्त 5 रनमध्ये 5 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये सगळ्यात कमी इकोनॉमी रेटने बॉलिंग करून 5 विकेट घेण्याचा विक्रम मढवालच्या नावावर झाला आहे.
लखनऊविरुद्धच्या या कामगिरीनंतर आकाश मढवालवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याचाही समावेश आहे. वसीम जाफरने आकाश मढवालसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे, जेव्हा जाफर उत्तराखंडचा कोच होता.
‘जेव्हा मी उत्तराखंडचा मुख्य प्रशिक्षक होतो, तेव्हा हा मुलगा ट्रायलसाठी आला होता, तेव्हा तो 24-25 वर्षांचा होता, त्याने फक्त टेनिस बॉल क्रिकेट खेळलं होतं. त्याच्या बॉलिंग स्पीडने आम्ही प्रभावित झालोआणि त्याला टीममध्ये घेतलं. वर्ष होतं 2019 आणि मुलाचं नाव होतं आकाश मढवाल, तो एवढ्या लवकर इकडे आला, त्याचा अभिमान वाटतो,’ असं वसीम जाफर म्हणाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.