जयपूर, 7 मे : आयपीएल 2023 मध्ये सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर रोमांचक विजय मिळवला आहे. राजस्थानने दिलेलं 215 रनचं आव्हान हैदराबादने शेवटच्या बॉलला पार केलं. 18 व्या ओव्हरपर्यंत राजस्थान हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं, पण ग्लेन फिलिप्सने कुलदीप यादवच्या 18 व्या ओव्हरमध्ये तब्बल 24 रन काढल्या. याच ओव्हर फिलिप्स आऊट झाल्यानंतर हैदराबादला शेवटच्या ओव्हरला विजयासाठी 17 रनची गरज होती.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात धोनीला विजयापासून रोखणाऱ्या संदीप शर्माकडे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने बॉल दिला. संजू सॅमसनच्या पहिल्या बॉलला अब्दूल समदने 2 रन काढल्या, यानंतर पुढच्या बॉलला त्याने सिक्स मारली. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला पुन्हा दोन रन काढून समदने चौथ्या बॉलला एक रन काढून मार्को यानसनला स्ट्राईक दिला.
IPL 2023 : रविवारच्या डबल हेडरने पॉईंट्स टेबल फिरलं, प्ले-ऑफची रेस आणखी थरारक
मार्को यानसनने पाचव्या बॉलला एक रन काढल्यानंतर पुन्हा एकदा अब्दूल समद स्ट्राईकला आला तेव्हा हैदराबादला जिंकण्यासाठी 1 बॉलमध्ये 5 रनची गरज होती. संदीप शर्माच्या सहाव्या बॉलवर अब्दूल समदने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण यात तो कॅच आऊट झाला. यानंतर राजस्थानने जल्लोष करायला सुरूवात केली, तेव्हाच मॅचमध्ये मोठा ट्विस्ट आला कारण अंपायरने नो बॉल दिला. आता हैदराबादला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 4 रनची गरज होती तेव्हा अब्दूल समदने सिक्स मारून राजस्थानच्या तोंडातून विजय खेचून आणला.
हैदराबादकडून या सामन्यात अभिषेक शर्माने सर्वाधिक 55 रन केले, तर राहुल त्रिपाठीने 47 आणि अनमोलप्रित सिंगने 33 रनची खेळी केली. क्लासेनने 12 बॉलमध्ये 26, फिलिप्सने 7 बॉल 25 आणि समदने 7 बॉल 17 रन केले. राजस्थानकडून बटलरने 95 रनची खेळी केली, तर संजू सॅमसन 66 रनवर नाबाद राहिला. यशस्वी जयस्वाल 18 बॉलमध्ये 35 रन करून आऊट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.