धर्मशाला, 19 मे : आयपीएल 2023 मधला पंजाब किंग्सचा प्रवास संपला आहे. राजस्थान रॉयलविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा 4 विकेटने पराभव झाल्यामुळे त्यांचं प्ले-ऑफचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पंजाबने दिलेल्या 188 रनच्या आव्हानाचा पाठलाग राजस्थानने 19.4 ओव्हरमध्ये केला. देवदत्त पडिक्कलने 51, यशस्वी जयस्वालने 50 तर शिमरन हेटमायरने 46 रनची खेळी केली. पंजाबकडून कागिसो रबाडाला 2 विकेट मिळाल्या. सॅम करन, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस आणि राहुल चहर यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर राजस्थानच्या बॉलरनी सुरूवातीलाच पंजाबला धक्के दिले. 50 रनवरच पंजाबचे 4 खेळाडू आऊट झाले होते, पण सॅम करन आणि जितेश शर्मा यांनी पंजाबला सावरलं. करनने 49 तर जितेशने 44 रनची खेळी केली. शाहरुख खाननेही नाबाद 41 रन केले. राजस्थानकडून नवदीप सैनीने 3 विकेट घेतल्या. ट्रेन्ट बोल्ट आणि झम्पाला एक विकेट घेण्यात यश आलं.
प्ले-ऑफचं गणित
राजस्थानविरुद्धच्या या पराभवामुळे पंजाबचं प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं आहे, तसंच राजस्थानही आता प्ले-ऑफला पोहोचणार नाही हे निश्चित झालं आहे. राजस्थान आणि पंजाबच्या 14 मॅच संपल्या आहेत. यातल्या राजस्थानच्या खात्यात 14 तर पंजाबच्या खात्यात 12 पॉईंट्स आहेत.
गुजरातची टीम आधीच प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे, तर सीएसके, लखनऊ, मुंबई आणि आरसीबी यांच्यात स्पर्धा आहे. सीएसके आणि लखनऊने त्यांचा उरलेला सामना गमावला आणि मुंबई-आरसीबीने त्यांचा शेवटचा सामना जिंकला तर गुजरात, मुंबई, आरसीबी आणि सीएसके-लखनऊपैकी एक टीम प्ले-ऑफला पोहोचेल. तर दुसरीकडे मुंबई किंवा आरसीबीने शेवटचा सामना गमावला तर सीएसके-लखनऊचा प्ले-ऑफचा मार्ग मोकळा होईल. मुंबईला प्ले-ऑफला पोहोचण्यासाठी हैदराबादविरुद्धचा सामना जिंकावा लागेल, तसंच आरसीबीच्या पराभवासाठीही त्यांना प्रार्थना करावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.